वर्धा : आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आहे. दोन जणांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा : Horoscope 4 February : आज 'या' राशींवर असेल शनीची वक्रदृष्टी, जाणून घ्या राशीभविष्य
वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तसेच मावळते अध्यक्ष भारत सासणे उपस्थित होते. कार्यक्रमात शिंदे जनतेला संबोधित करत असताना दोन जणांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी दोघांनाही तात्काळ ताब्यात घेतले.
अधिक वाचा : बाबा रामदेव यांचं मुसलमान आणि इस्लामबाबत वादग्रस्त वक्तव्य, मौलानांचा संताप
मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण सुरू करताच वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कागद फेकून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे सांगितले. त्यांनीही घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना आश्वासन देऊन पुन्हा भाषणाला सुरुवात केली. मात्र यानंतर पुन्हा काही कार्यकर्ते उभे राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांबाबत बोला आणि वेगळ्या विदर्भाची मागणी सुरू केली. दुसरीकडे काहींनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे काही फलक हवेत फेकले, त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.