MNS Meeting : मुंबई : मागील काही महिन्यांपासून मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (President Raj Thackeray) यांनी प्रखर हिंदुत्ववादाची (Hindutvaism) भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भोंग्यांवरुन राज ठाकरेंनी राजकारण मोठं तापवलं आहे. पुढील महिन्याच्या पाच तारखेला अयोध्येला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तर मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसेकडून 3 मेचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. परंतु त्यांनी आपला मुद्दा धार्मिक नसून सामाजिक असल्याचं म्हटलं आहे, तर दुसऱ्या बाजूला हिंदूना तयार राहण्याचे आवाहन केलं आहे. याच प्रकरणावरुन राज ठाकरेंना पीएफआय संघटनेने धमकी दिली होती. यासर्व पार्श्वभूमीवर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवतीर्थ वरील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 'जय श्रीराम' चा नारा देखील देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले आहेत याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना दिली. या बैठकीत अयोध्या दौरा, भोंगा वाद, राज ठाकरेंची सुरक्षा ते अक्षय्य तृतीयेला महाआरती या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं नांदगावकर म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असं म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता. यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिण्यात आल्याचं नांदगावकर म्हणाले. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली असून अयोध्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिलेत. तसेच अयोध्या दौऱ्यासाठी मनसे 10 ते 12 रेल्वे आरक्षित करणार, विशेष रेल्वेसाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंना पत्र लिहल्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली आहे. तसेच अक्षय्य तृतीयेला राज्यभरात महाआरती करण्याचे आदेशही राज ठाकरेंनी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.