Satara Dcc bank Election : भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने केला ' करेक्ट कार्यक्रम', गृहराज्यमंत्री, आमदार आणि माजी मंत्र्याच्या मुलासाठी फिल्डिंग

गावगाडा
Updated Nov 23, 2021 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत अनेक ठिकाणी तुल्यबळ लढती झाल्या. यात भाजपने दिलेल्या मदतीच्या हातामुळे शिवसेना आणि काॅंग्रेसचे अनेक उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला.

With the help of BJP, NCP carried out 'correct program', fielding for state Home Minister, MLA and former Ministers son
Satara Dcc bank Election : भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने केला ' करेक्ट कार्यक्रम', गृहराज्यमंत्री, आमदार आणि माजी मंत्र्याच्या मुलासाठी फिल्डिंग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राजे गटाने घेतलं एकमेकांशी जुळवून
  • या निवडणुकीत भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण
  • राष्ट्रवादीच्या अनेकांची धक्का

Satara Dcc bank Election  सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून दररोज घडणाऱ्या घटनांमुळे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. पण साताऱ्यात राष्ट्रवादीने विविध तालुक्यांमध्ये भाजपची मदत घेऊन काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा करेक्ट कार्यक्रम केला. यामध्ये ठाकरे सरकारमधील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा पराभव करुन नवीन राजकारणाच्या अध्यायाला सुरुवात केली. (With the help of BJP, NCP carried out 'correct program', fielding for state Home Minister, MLA and former Ministers son )

राजे गट एकसंघ 

सातारा जिल्हा बॅंकेवर मागील अनेक वर्षांपासून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची पकड आहे. त्यांनी सुरुवातीला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना आपल्या पॅनेलमध्ये घेण्यास टाळले. त्यानंतर उदयनराजेंनी भेटी-गाठींच्या सत्राद्वारे दबाव तंत्र वापरल्यानंतर राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून ना. रामराजे ना. निंबाळकर, उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ११ जणांना बिनविरोध निवडणून आणले. भाजपच्या मदतीने सत्ता अभाधित राहण्याचा फाॅर्मुला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यात सर्वत्र वापरला.

उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात

एकेकाळी जवळपास दोन दशके जिल्हा बँकेवर राज्याचे माजी सहकार मंत्री, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी एकतर्फी वर्चस्व राखले होते. कराड सोसायटी गटातून ते लढत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव काॅंग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दावा सांगितला. पण विद्यमान सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोणत्याही परिस्थितीत याच मतदारसंघातून संचालक होण्याचा हट्ट धरला. त्यासाठी त्यांनी भाजपचे नेते अतुल भोसले यांची मदत घेतली. मतमोजणीनंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मागील चार दशकांपासून वर्चस्व असलेल्या कराड तालुका सोसायटी गटात उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले.

पाटणकरांची सहकारवर पकड

पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक पारंपारिक देसाई विरुध्द पाटणकर गटातच ही निवडणूक झाली. सुरुवातीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनेलमधून लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देसाई्ंना बाजूला ठेवत सत्यजितसिंह पाटणकरांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर देसाईंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. एकूण १०२ मतांपैकी सत्यजीतसिंहांना ५८ तर ना देसाई यांना अवघी ४४ मते मिळाली. पाटणकरांचा १४ मतांनी विजय झाला. जिल्ह्यातील सोसायटी मतदारसंघांच्या विजयी उमेदवारांच्या तुलनेत पाटणकरांचे हे यश मोठे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांकडून आमदाराचा पराभव

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओखळले जाणारे माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे दहा वर्षांपासून कोरेगावमध्ये सक्रिय आहेत. मात्र, जिल्हा बॅंकेला ते जावलीतून लढतात. यावेळेलाही त्यांनी जावलीतून अर्ज भऱला. पण त्यांना भाजप आमदार शिवेंंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते असलेल्या ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान दिले. त्यांना राष्ट्रवादीच्या अनेकांनी मदत करीत मतदारांची पळवापळ केली. मतदानाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत हे प्रकरण मिटेल असे वाटत होते. पण निकालाच्या दिवशी अवघ्या एका मताने आमदार शिंदे यांचा पराभव झाला.

गोरेंचा चक्क राष्ट्रवादीला हात

सातारा जिल्ह्यात प्रत्येक निवडणूक माण तालुक्यात अत्यंत रंजक अशीच असते. यावेळीही बॅंकेसाठी तर माण मतदारसंघातून भाजप आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे व राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिव पोळ यांचे चिरंजीव मनोज पोळ यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेवून आमदार गोरे यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत वाढली. दोन्ही गटाकडून साम, दाम, दंड वापरुन संचालक बनण्याचा निर्धार केला. त्यानुसार आमदार गोरे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना 36 मते मिळाली. तसेच शिवसेनेचे शेखर गोरे यांना 36 मते मिळाली आहेत. त्यात चिठ्ठीद्वारे शेखर गोरे विजयी झाले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी