मला फक्त ५० कोटी द्या मी घरदार सगळं सोडून जिल्हा सोडतो, १ हजार कोटीच्या घोटाळ्यावरून भाजप आमदाराच वक्तव्य

1 thousand crore land scam allegation : माझी वडिलोपार्जित व मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी, मी त्यांच्या नावावर करतो. मला फक्त ५० कोटी द्या. मी घरदार सगळं सोडून जिल्हा सोडतो, ढगात गोळ्या मारू नका - सुरेश धस

1 thousand crore land scam allegation
मला फक्त ५० कोटी द्या मी घरदार सगळं सोडून जिल्हा सोडतो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २००  हेक्टर जमीन बनावट दस्तऐवज करून सुरेश धस यांनी बळकावल्याचा आरोप
  • ढगात गोळ्या मारू नका, तुमचं सरकार आहे चौकशी करा - सुरेश धस
  • आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी हे गंभीर आरोप केले आहेत

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन धस यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते. एक हजार कोटींच्या देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिल्यांदाच मौन सोडले असून, प्रतिक्रिया दिली आहे. आष्टी तालुक्यातील देवस्थान आणि इनामी जमीनीमधील २००  हेक्टर जमीन बनावट दस्तऐवज करून सुरेश धस यांनी बळकावल्याचा आरोप धस यांच्यावर करण्यात आला होता. 

तुमचं सरकार आहे चौकशी करा, ढगात गोळ्या मारू नका – सुरेश धस

धस यांनी त्यांच्यावर होत असलेल्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाचं प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, १ हजार कोटीचा आरोप करणाऱ्यांना माझ्याकडील, माझी वडिलोपार्जित व मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी, मी त्यांच्या नावावर करतो. मला फक्त ५० कोटी द्या. मी घरदार सगळं सोडून जिल्हा सोडतो, ढगात गोळ्या मारू नका, तुमचं सरकार आहे चौकशी करा, असे आव्हान सुरेश धस यांनी तक्रारदारांना केलं आहे. खोटे आरोप करून मला बदनाम करु नका, असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. ते पाटोदा येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. 

राम खाडे यांनी ईडीच्या कार्यालयात तक्रार केली आहे

गेल्या अनेक दिवसांपासून जमीन हडपल्याच्या आरोपावर सुरेश धस यांनी जाहीर सभेत मौन सोडलं आहे. सुरेश धस म्हणाले, की ईडीकडे तक्रार केली, त्याना माझं म्हणणं आहे, की माझ्याकडे १ हजार कोटीची जमीन संपत्ती आहे. त्याना माझं चॅलेंज आहे फक्त ५० कोटी द्या. मी माझी वडिलोपार्जित सगळी प्रॉपर्टी घर दार तुमच्या नावावर करून जिल्हा सोडून जातो. दरम्यान, या जमिनीची किंमत १ हजार कोटी आहे, अशी तक्रार राम खाडे यांनी ईडीच्या कार्यालयात केली आहे. त्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तक्रारदारांना आव्हान दिले आहे. उगाच ढगात गोळ्या सोडू नका, टीका टिपण्ण्या करताना दुसऱ्याच्या इज्जती घ्यायच्या. असही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी