औरंगाबाद : पालकमंत्री काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या हस्ते मालाडमधील एका मैदानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले असून त्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात हे प्रकरण ताजे असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात महाराणा प्रताप यांचा पुतळा (Maharana Pratap Statue) बसवण्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून एका नव्याच वादाला तोंड फुटले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा पुतळा उभारण्यास विरोध केला आहे. तर , भाजप आणि शिवसेना हा पुतळा उभारण्यासाठी आग्रही आहे. दरम्यान, एमआयएमचे खासदार जलील यांनी म्हटलं आहे की, या निधीतून ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी. जलील यांच्या वक्तव्यानंतर या वादात आता शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उडी घेतली आहे. शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणारच; यासाठी मी पुढाकार घेईन, असं सत्तार यांनी म्हटल आहे. सत्तार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता एमआयएम काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : घरबसल्या 2 रुपयांच्या या नाण्यातून कमवा 5 लाख रुपये
अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा राहणारच. तसेच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे. औरंगाबादेत हा पुतळा बसवताना मी स्वतः पुढे असेन.’ असं शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटल आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी औरंगाबादमधील महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीच्या वादासंबंधी ते ते बोलत होते.
जलील यांनी महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीला विरोध करत म्हटल आहे की, पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, हाच शूर योद्धा महाराणा प्रताप यांच्या प्रती आदर भाव असेल, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. दरम्यान, जलील यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला आहे. महाराणा प्रताप यांचा पुतळा शहरातील कॅनॉट परिसरात एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्याची योजना आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करण्याचा भाजप आणि शिवसेनेचा आग्रह आहे. तर दुसरीकडे जलील यांनी केलेल्या विरोधामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.