औरंगाबादेत कुत्र्यासोबत घडली अशी घटना,आदित्य ठाकरेंनी देखील घेतली घटनेची दखल

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 07, 2020 | 14:24 IST

औरंगाबादमधील दोन तरुणांनी दुचाकीला दोरीने कुत्र्याला बांधून फरफटत नेल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Aditya Thackeray also took note of the incident that took place with a dog in Aurangabad
औरंगाबादेत कुत्र्या सोबत घडली अशी घटना,आदित्य ठाकरेंनी देखील घेतली घटनेची दखल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या गंभीर घटनेची दखल घेतली
  • पालकमंत्री सुभाष देसाई यांना हा व्हिडिओ पाठवून हळहळ व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले.
  • कारचालकाने हा सगळा क्रूरपणाचा कळस आपल्या कारमधूनचं कॅमेऱ्यात कैद केला आहे

औरंगाबाद: काही दिवसापूर्वी घडलेली गर्भवती हत्तीणच्या हत्येच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. केंद्र सरकारनेही या घटनेची दखल घेत दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच राज्यातील औरंगाबाद शहरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा संतापाची लाट उसळली आहे.

क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद 

औरंगाबाद शहरातील तिरुपती वॉशिंग सेंटरजवळील अजबनगर येथे ५ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा वाईट प्रकार घडला असून या प्रकरणाची एका सामाजिक संस्थेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुत्र्याला फरफटत नेले

दरम्यान, सदर घटना ५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. दोन तरुणांनी दुचाकीला एका दोरीने कुत्रा बांधला होता. सुरुवातील दुचाकी हळू चालविली मात्र, नंतर जोरात पळविली. गाडी जोरात पळविल्यामुळे कुत्र्याला पळता आले नाही आणि तो पडला. त्यानंतरही या तरुणांनी दुचाकी न थांबवता तशीच पुढे पळवली. त्यामुळे कुत्र्याला गळ्याला फास बसला. तरीही त्यांनी त्या  कुत्र्याला काही अंतर फरफटत नेले.

काराचालकाने केला व्हिडिओ शूट

तरुण एका कुत्र्याला क्रूरपणे दुचाकीला बांधून गाडी पळवत होते, त्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकाने हा सगळा क्रूरपणाचा कळस आपल्या कारमधूनचं  कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

आदित्य ठाकरेंनी घेतली घटनेची दखल

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या गंभीर घटनेची दखल घेतली असून, त्यांनी हा व्हिडिओ औरंगाबादचा असल्याचे समजल्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांना हा व्हिडिओ पाठवून हळहळ व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांना माहिती कळवावी

औरंगाबाद शहरातील घडलेला क्रूर प्रकार करणाऱ्या दुचाकीला कुत्रा बांधून त्याला फरफटत नेणाऱ्या त्या तरुणांविषयी जर कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी क्रांतीचौक पोलिसांना त्या तरुणांची माहिती कळवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी केले आहे. सीसीटीव्हीत दुचाकीचा क्रमांक अर्धवट दिसत असल्याने आरोपीचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत.

दिल्लीमध्ये घडली होती अशीच घटना

काही दिवसापूर्वी राजधानी दिल्लीत देखील अशीच घटना घडली होती. एका कुत्र्याला गाडीला बांधून अशाच प्रकारे ओढत घेऊन जाण्याचा प्रकार घडला होता. दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने असे कृत्य करणाऱ्या तरुणाला जाब विचारल्यानंतर त्याने देखील कुत्र्याला तिथेच सोडून पळ काढला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी