ashok chavans sensational allegations written complaint to the additional superintendent of police in nanded : मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केल्याची तक्रार माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. घातपात घडविण्याचाही प्रयत्न आहे; अशा स्वरुपाचे गंभीर आरोप करत अशोक चव्हाण यांनी लेखी स्वरुपात अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून आणि मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. विशेष म्हणजे याची कुणकुण त्यांना अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. स्वत: अशोक चव्हाण यांनीच या घडामोडींची माहिती पत्रकारांना दिली.
माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे. पुढील काळात या पत्राद्वारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अनेक निवडणुका आहे. या काळात राजकीयदृष्ट्या प्रतिमाहनन करण्यासाठी आणि जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
जगात सर्वात महाग पेट्रोल कुठे? वाचा संपूर्ण यादी
जगातील सर्वात सुंदर Railway Stations
मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. अज्ञात व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करत आहे. माझा घातपात करण्याचे कारस्थान असावे, असा संशय पण अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी पोलिसांना पत्र लिहून केली आहे.