औरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू, १० जुलैपासून १८ जुलैपर्यंत संचारबंदी

Aurangabad Janta Curfew: औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर आता प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Janta Curfew in Aurangabad
औरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • औरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू, १० जुलै ते १८ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू
  • औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ
  • कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घेण्यात आला निर्णय 

Janta Curfew imposed in Aurangabad: औरंगाबादमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाने जनता कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लागू केली आहे. १० जुलै ते १८ जुलै या कालावधीत ही संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीनंतर हा संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१० जुलै ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संचारबंदीची माहिती देताना म्हटलं, औरंगाबाद शहर आणि शहरालगत वाळूज एमआयडीसी परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० ते १८ जुलै दरम्यान ही संचारबंदी असणार आहे. या संचारबंदीत उद्योगधंदे, व्यवसाय सुद्धा बंद असणार आहेत. या संचारबंदीत प्रशासनाला सहकार्य करावे आणि घरातच रहावे असे आवाहन करण्यात आले आहेत. आपल्या जीवनावश्यक वस्तू, किराणा, भाजीपाला अशा आवश्यक वस्तूंचा आठ दिवस पूरेल इतका साठा करुन ठेवावा. घाबरून गरजेपेक्षा जास्त साठा करु नका असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन नियमांचे पालन करा

वाळूज परिसरात यापूर्वी म्हणजेच ४ जुलै रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, आता १० जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या संचारबंदीत उद्योगधंदे सुद्धा बंद असणार आहेत. जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन नियमांचे पालन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाहीये. आम्हाला १०० टक्के खात्री आहे की १० जुलै ते १८ जुलै या कालावधीत नागरिक घरीच थांबतील आणि कोरोनावर मात करु.

उद्योग, किराणा दुकाने बंद राहणार 

औरंगाबादमध्ये लागू करण्यात येणाऱ्या या जनता कर्फ्यूमध्ये सर्व उद्योग, व्यापार, व्यवसाय, किराणा दुकाने बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप ठराविक काळासाठी सुरू राहणार आहेत आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल मिळणार आहे.

औरंगाबादमध्ये १५० रुग्णांची वाढ 

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळी १५० कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. या १५० रुग्णांमध्ये ८५ पुरूष आणि ६५ महिलांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६८८० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी ३३७४ रुग्ण बरे झाले असून ३१० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर आता ३१९६ जणांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी