MHADA: म्हाडाच्या २८०० सदनिका आणि २२० भुखंडाच्या विक्रीसाठी सोडत, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

म्हाडाने २८०० सदनिका आणि २२० भुखंडाच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहे. याची सोडत प्रक्रिया १० जून २०२२ रोजी काढण्यात येणार आहे. अर्जदारांनी म्हाडाच्या वेबसाईटवर अर्ज करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

mhada
म्हाडा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • म्हाडाने २८०० सदनिका आणि २२० भुखंडाच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहे.
  • याची सोडत प्रक्रिया १० जून २०२२ रोजी काढण्यात येणार आहे.
  • अर्जदारांनी म्हाडाच्या वेबसाईटवर अर्ज करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

MHADA : औरंगाबाद : म्हाडाने २८०० सदनिका आणि २२० भुखंडाच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहे. याची सोडत प्रक्रिया १० जून २०२२ रोजी काढण्यात येणार आहे. अर्जदारांनी म्हाडाच्या वेबसाईटवर अर्ज करावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते आज  ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक १० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह येथे काढण्यात येणार आहे.

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या येथील शिवगड या शासकीय निवासस्थानी आयोजित गो-लाईव्ह कार्यक्रमाला औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती संजय केणेकर, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, संगणक कक्षाच्या प्रमुख श्रीमती सविता बोडके व  मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले आदी उपस्थित होते.

 सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता  सोडतीची माहिती देणाऱ्या पुस्तिका तयार करण्यात आली असून ही पुस्तिका  https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडतीसाठीची  नियमावली, मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत.  सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन औरंगाबाद मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दिनांक २६ एप्रिलपासून सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराला अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. अर्ज नोंदणीची प्रक्रिया दिनांक २४ मे, २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील.  ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २५ मे, २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत आहे. अनामत रकमेच्या ऑनलाईन स्वीकृती करिता दिनांक २६ मे, २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत असून बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा दिनांक २७ मे, २०२२ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक २ जून, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.


प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)

औरंगाबाद मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३३८ सदनिका आहेत. यामध्ये लातूर एमआयडीसी येथे ३१४ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे १८ सदनिका, औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथे ६ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजना

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे २७ भूखंड व २ सदनिका, अंबड (जि. जालना) येथे ६ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना  येथे ३८ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) सोडतीत भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, हिंगोली येथे १६ सदनिका, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे ५३ भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ ४ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे १९ भूखंड सोडतीत उपलब्ध आहेत.

सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, कन्नड (जि. औरंगाबाद) येथे ६ सदनिका, हिंगोली येथे ३५ सदनिका, परभणीतील गंगाखेड रोड येथे २५ सदनिका व ३४ भूखंड, उस्मानाबाद एमआयडीसी एरिया येथे ५ सदनिका, चिखलठाणा (औरंगाबाद) येथे ३९० सदनिका, सेलू (जि. परभणी) येथे २ भूखंड, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे १ गाळा, नवीन कौठा (जि. नांदेड) येथे १ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे ५९ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी (High Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे ७ भूखंड, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे १ भूखंड, बन्सीलाल नगर येथे १ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून या गटासाठी  पैठण (जि. औरंगाबाद) येथे २१ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे ३९ सदनिका उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी