भाजपच्या माजी मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, अडचणीत येण्याची शक्यता

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Nov 29, 2020 | 17:49 IST

Babanrao Lonikar's audio clip goes viral: आयपीएस अधिकारी हसन गौहर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांनी शहरातील अवैध दारूचे अड्डे, मटका आणि गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Babanrao Lonikar's audio clip goes viral
भाजपच्या माजी मंत्र्याची ऑडीओ क्लीप व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वादग्रस्त संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
  • पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांना फोन करून झापले
  • आयपीएस अधिकारी हसन गौहर यांनाही केला होता फोन

जालना : भारतीय जनता पार्टीचे (BJP) माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. त्यांनी परतूरचे पोलीस निरीक्षक आणि आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. बबनराव लोणीकर यांनी 'आमचे शंभर आमदार (mla) आहे, उद्या विधानसभेत उलटा टांगेन', अशा शब्दांत त्यांनी म्हटलं असल्याचे दिसून येत आहे.

काय आहे प्रकरण?

परतूर येथील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हसन गौहर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांनी शहरातील अवैध दारूचे अड्डे, मटका आणि गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मोंढा भागात गोविंद मोर नावाच्या व्यापाऱ्यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली होती. परंतु, ज्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकायचा होता, त्याच्या घराऐवजी मोर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. पोलिसांनी आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल तातडीने त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

वादग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, बबनराव लोणीकर यांनी पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांना फोन करून झापले असल्याचे देखील या ऑडीओ क्लीप मधून स्पष्टपणे ऐकू येत आहे. परतूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे व परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हसन गौहर यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या वादग्रस्त संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत बबनराव लोणीकर?

दरम्यान बबनराव लोणीकर यांनी सुरुवातीला पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांना फोन करून, 'मला परतूरच्या दहा पंधरा व्यापाऱ्यांचे फोन आले आहे. ओमप्रकाश यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरात खुलेआम दारू, मटका आणि दोन नंबरचे धंदे सुरू आहे. तुमच्या साहेबाला, काही अक्कल नाही का? तो बिचारा प्रामाणिक माणूस आहे. कोर्टाचा आदेश नसताना लोकांच्या घरात घुसता कसं काय? तो साधा गुटखा सुद्धा खात नाही. एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरावर धाड टाकताय, सापडलं का काही? साहेब आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही? तुम्ही काय रझाकारी लावली आहे का? विधानसभेत उलटा टांगेन तुम्हा सगळ्यांना, आयपीएस अधिकारी झाला म्हणून लय मोठा झाला आहे का? विधानसभेत १००आमदार आहे, सस्पेंड करण्याची मागणी करतील, त्याला एसपी व्हायचं आहे म्हणा, त्यामुळे माज चढल्यावाणी करू नको म्हणा. असं म्हटलं आहे.

आयपीएस अधिकारी हसन गौहर यांनाही केला फोन

पोलीस निरीक्षक यांना फोन केल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना फोन केला. दरम्यान याचीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. गौहर यांनी घटनेबद्दल नरमाईची भूमिका घेतली असल्याचे ऑडिओ क्लिपमधून दिसत आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिपमुळे बबनराव लोणीकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी