VIDEO: बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का?, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका  

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 12, 2020 | 14:36 IST

Chandrakant Patil: बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का? असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महसूल मंत्र्यांवर टीका केली आहे. ते तुळजापूरमध्ये बोलत होते. 

balasaheb thorat understands economic downturn bjp leader chandrakant patil criticized
VIDEO: बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का?, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका    |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आर्थिक मंदीवरुन चंद्रकांत पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका
  • नाईट लाईफवरुन चंद्रकांत पाटलांचा मंत्री आदित ठाकरेंवर निशाणा
  • महाविकास आघाडीतील मंत्री उधळपट्टी करत असल्याचा दावा

तुळजापूर: एकीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या सुमार कामगिरीनंतर विरोधक जोरदार टीका करत असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी देखील आता विरोधकांना प्रत्त्युतर देण्यास सुरुवात केली आहे. गेले काही दिवस आर्थिक मंदीवरुन भाजपवर टीका केली जात आहे. विरोधकांच्या याच टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. याचबाबत बोलताना त्यांनी आज (बुधवार) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना टार्गेट केलं आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवादही साधला. यावेळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांनी सडकून टीका केली. 

यावेळी राज्यातील मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील मिश्किलपणे त्यांनी निशाणा साधला. 'बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का? मंदी ही कुठल्या एका देशातून दुसऱ्या देशात येत नाही. तर मंदी ही जगभर असते. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी आधी मंदी म्हणजे काय ते समजून घ्यावं.' असं म्हणत थोरातांवर निशाणा साधला आहे.  

चंद्रकांत पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका

याचवेळी चंद्रकांत पाटलांनी नाईट लाईफबाबत भाष्य करताना शिवसेना आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. 'नाईट लाईफमुळे जरी रोजगार मिळत आहे असं वाटलं तरी, महाराष्ट्रात आया-बहिणी सुरक्षित नाहीत. जेव्हा नवरात्रीला एक-दोन दिवस रात्रीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाते किंवा  गणेशोत्सवात जेव्हा परवानगी दिली जाते तेव्हा देखील किती गैरप्रकार होतात. हे आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे खरं तर नाईट लाइफची काहीही आवश्यकता नव्हती. शेवटी समाज रचना ही नियमाने आणि व्यवस्थित राहिली पाहिजे.' असं पाटील यावेळी म्हणाले. 

'एका कुटुंबाला वाटतं म्हणून त्यांच्या घरातील व्यक्ती मंत्री, त्यानंतर एका व्यक्तीला वाटतं म्हणून नाईट लाईफ आपल्याकेड सुरु होते.' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या नाईट लाईफसंबंधीच्या निर्णयाच्या सडकून टीका केली आहे. 

महाविकास आघाडीतील मंत्री उधळपट्टी करत असल्याचा दावा

दरम्यान, याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीतील सरकारमधील मंत्र्यांच्या उधळपट्टीवर देखील टीका केली आहे. 'मी पूर्वी राहत असलेल्या बंगल्याला साधा रंग देखील दिला नाही. परंतु या सरकारमधील मंत्री हे ही भिंत पाड, ती भिंत पाड असं करत आहेत. परंतु तुम्ही त्या बंगल्यात किती दिवस राहणार आहात?' असं म्हणत त्यांनी हे  सरकार जास्त दिवस चालणार नाही असं म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी