Sapna Choudhary at Beed : प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सपना चौधरीच्या (Sapna Choudhari) ठुमक्यांवर थिरकत बीडकरांनी (Beed) दहीहंडी उत्सव (Dahi Handi) साजरा केला. कुठल्याही दुःखावर मात करत त्यातून सावरणं आणि आयुष्याचा आनंद लुटणं किती महत्त्वाचं आहे, हे बीडकरांनी या उपक्रमातून दाखवून दिलं. मोठमोठ्या कलाकारांना बोलावून दहीहंडी साजरी करण्याची मुंबईकडची पद्धत आता ग्रामीण भागातदेखील मूळ धरू लागल्याचं या कार्यक्रमातून दिसून आलं. थेट हरियाणाची नृत्यांगना सपना चौधरीलाच बीडमध्ये दहीहंडीच्या व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं होतं. कधी दुष्काळ, तर अतिवृष्टीचं संकट जणू पाचवीला पुजलेले बीडकर काही क्षण सपना चौधरीच्या ठुमक्यांवर बेभान होऊन नाचले आणि काही क्षण का असेना आपल्या आयुष्यातलं दुःख विसरले.
अभिनेत्री आणि नृत्यांगना सपना चौधरीच्या ठुमक्यांवर थिरकत बीडकरांनी दहीहंडीचा उत्सव साजरा केला. सर्वसामान्य तरुणांसह नेतेमंडळीही यात सहभागी झाली. #dahihandi2022 pic.twitter.com/iHd5YWFAoQ — Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 19, 2022
बीडमध्ये आयोजित या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड गर्दी उसळली होती. जिथे जागा मिळेल तिथून हा डान्स पाहण्यासाठी एकच चढाओढ सुरू होती. काही तरुण पहाटेपासूनच जागा पकडून बसले होते. ज्यांना घरातून निघायला उशीर झाला, त्यांना आपण व्यासपीठाजवळ पोहोचू शकणार नाही, याची खात्री पटली. मैदानाच्या आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या छतांवर मग या तरुणांनी जागा शोधली आणि तिथं बसून नृत्याचा आनंद घेतला. काही तरूण तर इतके उत्साही निघाले की या परिसरात पार्क करण्यात आलेल्या काही क्रेनचा त्यांनी आधार घेतला आणि त्यावर चढून डान्स पाहण्याचा आपला ‘सपना’ पूर्ण केला.
अधिक वाचा - जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
दोनच दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं होतं. बीडकर अजूनही हा धक्का पचवू शकलेले नाहीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेटेंना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि मौन पाळण्यात आलं. त्यानंतर मात्र बीडकरांनी अचानक गिअर बदलत दहीहंडीचं सेलिब्रेशन सुरू केलं आणि सपना चौधरीच्या तालावर ठेका धरला. ‘दीप ज्योत’ ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली दोन वर्षं कोरोनाच्या संकटामुळे बीडकरांना दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता आला नव्हता. त्याची कसर बीडकरांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरून काढली.
अधिक वाचा - जन्माष्टमीच्या मराठीतून द्या शुभेच्छा