मोठी बातमी : लष्कराचा पेपर फुटला, माजी सैनिकांनीचं पेपर फोडल्याने खळबळ

big breaking : army paper leak : व्हेईकल मेकॅनिक या पदाच्या भरतीचा पेपर फुटला. या प्रकरणी दोन माजी सैनिकांसह एका एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

big breaking :  army paper leak
मोठी बातमी : लष्कराचा पेपर फुटला, माजी सैनिकांनीचं पेपर फोडल्याने खळबळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सदर भरतीत चाळीस परीक्षार्थींना त्यांनी पेपर पुरवले असल्याचं आले समोर
  • सत्तर हजाराची रक्कम स्वीकारताना आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने त्यांना ताब्यात घेतलं
  • तिघांकडून लष्कर भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे आढळून आली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरु आहे. पोलीसांनी राज्यातील पेपरफुटी प्रकरणात अनेकांना अटक केली आहे. दरम्यान आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. व्हेईकल मेकॅनिक या पदाच्या भरतीचा पेपर फुटला असल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण हे पिंपरी चिंचवड पोलिसांनी समोर आणलं आहे. यासाठी आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने देखील महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती मिळाली आहे. या संयुक्त कारवाईत दोन माजी सैनिकांसह एका एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सदर भरतीत चाळीस परीक्षार्थींना त्यांनी पेपर पुरवले असल्याचं आले समोर

निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना सदर पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान , या भरतीत चाळीस परीक्षार्थींना या संशयीतांनी पेपर पुरवले होते अशी माहिती समोर आली आहे. त्यापैकी 36 परीक्षार्थी पास होऊन, त्या पदावर रुजू झाल्याचा दावा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला आहे. जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स अर्थात जीआरईएफ या विभागासाठी ही ३१ ऑक्टोबर २०२१ ला ही  भरती पार पडली होती.

सत्तर हजाराची रक्कम स्वीकारताना आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने त्यांना ताब्यात घेतलं

सूत्राकडून मिळालेली माहिती अशी आहे की, ४ जानेवारी रोजी आर्मी इंटिलिजन्सने रक्षक चौकात सापळा रचला होता. लष्कराच्या जीआरईएफ विभागातील व्हेईकल मेकॅनिक पदासाठीच भरती होणार असून, या पदाच्या भरतीसाठीची पाच लाख रुपयांची बोली देखील ठरली होती. गजानन मिसाळ आणि धनंजय वट्टमवार यांना तिन्ही आरोपींनी संगनमत करून भरतीचे आमिष दाखवले होते. त्यानुसार पहिली टोकन रक्कम पिंपरी चिंचवड परिसरात स्वीकारली जाणार होती. तीच सत्तर हजाराची रक्कम स्वीकारताना आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने त्यांना ताब्यात घेतलं. मग पिंपरी चिंचवड पोलिसांना पाचारण करून त्यांना अटक करण्यात आली. सदर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून , सदर प्रकरणात आणखी कोणाचे हात आहेत याचा देखील तपास पोलीस करत आहेत. त्याचंबरोबर माजी सैनिकांकडे हे पेपर नेमके आले कुठून? याचा छडा लावण्याचं आता मोठं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे. 

तिघांकडून लष्कर भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे आढळून आली

पोलिसांनी अटक केलेल्या या तिघांकडून लष्कर भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता ३१ ऑक्टोबरला झालेल्या भरतीचा पेपर फोडण्यात आल्याचं समोर आलं. न्यायालयाने आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी