भाजपला मोठा धक्का, ८ नगरसेवकांसह शहराध्यक्षही शिवसेनेच्या गळाला

औरंगाबाद
Updated Feb 19, 2020 | 10:39 IST

औरंगाबाद महापालिका निवडणुकीला आता साधारण दोन महिने उरले आहेत. मात्र, त्याआधीच भाजपला धक्का बसला आहे. कारण भाजपचे ८ नगरसेवक हे आज (बुधवार) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

bjp aurangabad head and 8 corporators to join shivs sena
भाजपला मोठा धक्का, ८ नगरसेवकांसह शहराध्यक्षही शिवसेनेच्या गळाला  |  फोटो सौजन्य: Times Now

औरंगाबाद: औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण औरंगाबादचे भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि तब्बल ८ नगरसेवक हे आज (बुधवार) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासोबत आठ नगरसेवक फुटल्याने भाजप पालिका निवडणुकीत बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासमीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. अशावेळी औरंगाबाद महापालिकेच्या मोठ्या निवडणुकीत जनतेचा कौल नेमका कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशावेळी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीआधी भाजपला धक्का बसला आहे. 

भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि इतर आठ नगरसेवक हे आज मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याचवेळी ते शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश देखील करणार असल्याचं समजतं आहे. 

सध्या औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक २९ नगरसेवक आहेत. तर भाजपचे २२ नगरसेवक आहेत. त्या आता ८ नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरल्याने या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपसमोर शिवसेनेसह एमआयएमचं देखील आव्हान असणार आहे. त्यामुळे आता भाजप नेमकी कोणती चाल खेळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. 

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार आहे. या निवडणुकीत भाजपसह एमआयएमला रोखण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत (महाविकास आघाडी) निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी भाजपला या तीनही पक्षांकडून तगडं आव्हान मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी म्हणावी तेवढी सोपी नसणार आहे.   

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. त्यामुळे औरंगाबाद निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इथे मनसे थेट शिवसेनेविरोधात निवडणूक लढविणार असल्याने त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या निवडणूक नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...