जात विचारली आणि बिल्डरने घर विकण्यास दिला नकार , औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

builder rejected house to sc lawyer : एका उच्चभ्रू सोसायटीत घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला जातीचं कारण सांगून घर नाकारलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली

builder rejected house to sc lawyer
जात विचारली आणि बिल्डरने घर विकण्यास दिला नकार , औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वकिलाने चिखलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन बिल्डर आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली
  • 'तुमच्या जातीच्या लोकांना घर देता येणार नाही' – कर्मचारी
  • कील महेंद्र गंडले यांनी घराची पाहणी केल्यावर त्यांना घर आवडले होते

औरंगाबाद : एका उच्चभ्रू सोसायटीत घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला जातीचं कारण सांगून घर नाकारलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना औरंगाबाद शहरातील चिखलठाणा परिसरात घडली आहे. दरम्यान, सदर वकिलांना घर आवडल्यानंतर त्यांनी पुढील चौकशी करण्यासाठी करण्यासाठी गेले असता तिथे त्यांना त्यांच्या जातीबद्दल विचारण्यात आले होते. त्यांनी आपली ओळख सांगितली आणि त्यावरून ते अनुसूचित जातीतील असल्याचे समजताच त्यांना घराबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. संबंधित वकिलाने बांधकाम साईटवर जाऊन रो हाऊसची पाहाणी केल्यानंतर त्यांना घर आवडलं होतं. पण बांधकाम साईटवरील एका कर्मचाऱ्याने त्यांना जात विचारली आणि 'तुम्हाला इथे घर देता येणार नाही' असं म्हटलं. त्यानंतर वकील थेट हाऊस बांधणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयात जाऊन घराबाबत चौकशी केली. पण त्याठिकाणी देखील जातीचं कारण सांगून बिल्डरने त्यांना घर देण्यास नकार दिला असल्याने वकिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

वकिलाने चिखलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन बिल्डर आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली

सदर प्रकार हा वकिलाच्या जिव्हारी लागला असून त्यांनी थेट या संतापजनक प्रकारानंतर चिखलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन बिल्डर आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. महेंद्र गंडले असं संबंधित वकिलाचं नाव आहे. ते औरंगाबाद खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, सदर घटना ही ७ जानेवारी रोजी घडली आहे.  यावेळी वकील यांच्या सोबत त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या. पत्नी आणि मुलांसह भाईश्री ग्रुप निर्मित भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट पाहण्यासाठी गेले होते. येथील रो हाऊस त्यांना आवडले. त्यामुळे त्यांनी साइटवरील कर्मचाऱ्यांकडे घराबाबत विचारणा केली. यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी गंडले यांना त्यांची जात विचारली. असा प्रश्न विचारल्याने गंडले यांना धक्का बसला. 

'तुमच्या जातीच्या लोकांना घर देता येणार नाही' – कर्मचारी

वकील महेंद्र गंडले यांनी घराची पाहणी केल्यावर त्यांना घर आवडले होते. त्यामुळे, त्यांनी कर्मचाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण अनुसूचित जातीचे असल्याचं सांगितले. त्यावर 'तुमच्या जातीच्या लोकांना घर देता येणार नाही', असं कर्मचाऱ्यांकडून थेट सांगण्यात आलं. यानंतर गंडले हे रो हाऊस तयार करणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयात गेले. येथे त्यांनी घराबाबत चौकशी केली. पण तिथेही त्यांना जात विचारून घर नाकारण्यात आलं. या धक्कादायक प्रकारानंतर गंडले यांनी चिखलठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी देखील घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी