उस्मानाबादमध्ये व्हायरसचा वेगाने संसर्ग, एकाच कुटुंबातील ८ जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 03, 2020 | 12:40 IST

उस्मानाबाद जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, २ जून रोजी आलेल्या अहवालात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकाच दिवसात तब्बल ११ रुग्णांची वाढ झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे

Corona blast in Osmanabad city! So many patients from the same family
उस्मानाबाद शहरात कोरोनाचा धमाका! एकाच कुटुंबातील एवढे रुग्ण  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • २ मे रोजी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव आले
  • जिल्ह्यातील ५५ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त
  • एका नातेवाईकामुळे कुटुंबातील ८ जणांना बाधा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. २ मे रोजी जिल्ह्यात तब्बल ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उस्मानाबाद शहरातील ८, कळंब शहरातील २ आणि कळंब तालुक्यातील शिरढोण येथील एक अश्या ११ जणांचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता ८८ झाली आहे.

एकाच कुटुंबातील आठ जण

२ मे रोजी आलेल्या अहवालामध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश असून ते सर्वजण उस्मानाबाद शहरातील आहेत. तर अन्य तीन कळंब तालुक्यातील आहेत. यामध्ये शिराढोणचा एक तर कळंब शहरातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. व्ही. गलांडे यांनी दिली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मंगळवार धक्कादायक ठरला आहे. जिल्ह्यातील ५५ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाली आहेत. यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. तर ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकाची चाचणी पुन्हा घेतली जाणार आहे.उस्मानाबाद शहरातील आठहीजण एकाच कुटुंबातील असून उस्मानपुरा भागातील आहेत. यापूर्वी रुग्णाच्या संपर्कात आलेले हे सर्वजण आहेत तर कळंब शहरातील दोघेजणही यापूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. शिराढोन येथील एक रुग्णही यापूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेला आहे.

एका नातेवाईकामुळे कुटुंबातील ८ जणांना बाधा

नळदुर्ग शहरातून एक रुग्ण उपचार घेण्यासाठी काही दिवसापूर्वी उस्मानाबाद शहरात आला होता. त्याने शहरात येऊन येथील दोन खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. जिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली व तो पॉझिटिव आला. शहरातील उस्मानपुरा भागात तो एका नातेवाईकाकडे राहिला होता. त्या नातेवाईकाच्या कुटुंबातील आठ जण आज पॉझिटिव आले आहेत. तर दोन खाजगी रुग्णालयातील काही जणांना क्वारणटाईन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आठही जण एकाच कुटुंबातील आहेत.पालिकेचे अनेक कर्मचारी, शिक्षक शहरातील घरोघरी जाऊन बाहेरून आलेल्यांचा शोध घेतात. उस्मानपुरातील 'त्या' नातेवाइकांच्या कुटुंबाच्या घरीही काही शिक्षक गेले होते. मात्र आमच्याकडे कोणीही पाहुणा आला नाही अशी चुकीची माहिती दिली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

शहरात यापूर्वी आतापर्यंत दहा रुग्ण आढळून आले आहे. तर आजच्या एका दिवसांतील ८ पॉझिटिवमुळे शहरातील रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात चांगलाच धोका वाढला असल्यास चित्र दिसत आहे. एकाच कुटुंबातील आठ व्यक्ती पॉझिटिव आल्याने हे आठ जण अनेकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.


उस्मानाबादेत पहिल्यांदाच आढळले मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, २ जून रोजी आलेल्या अहवालात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकाच दिवसात तब्बल ११ रुग्णांची वाढ झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. त्यातच नळदुर्गहुन आलेल्या नातेवाईकामुळे एकाच कुटुंबातील आठ जणांना बाधा झाली असून, जिल्ह्यातील चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी