तेरणा साखर कारखाना प्रकरणी शिवसेना आमदार तानाजी सावंतांना कोर्टाचा 'दे धक्का'

Court slaps in Terna sugar factory case : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला आहे.

Court slaps in Terna sugar factory case
तेरणा साखर कारखान्याचे भविष्य अधांतरी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भैरवनाथ उद्योगसमूहला २५ वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली होती
  • काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती
  • “अमित देशमुख्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साधला जातोय निशाणा” - अण्णा खोत

Court slaps in Terna sugar factory case उस्मानाबाद – शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाला ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला होता. मात्र ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात दावा केला होता त्यावर निर्णय देण्यात आला आहे. डीआरटी कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय देत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची निविदा प्रक्रिया रद्द ठरविली आहे. तसेच निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश दिला.  या निर्णयामुळे तेरणा कारखाना निविदा प्रकरणी जिल्हा बँक व भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला आहे.

भैरवनाथ उद्योगसमूहला २५ वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली होती

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योगसमूहला २५  वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली होती मात्र आता ही प्रक्रिया रद्द केली आहे. दरम्यान, ३१ जानेवारी २०२२ पर्यंत डीआरटी कोर्टातील भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर फॅक्टरी यांच्यातील प्रकरण निकाली लावावे असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गंगापूरवाले यांनी दिले होते. सदर प्रकरणी महत्वाचा निकाल आला असून, आता भैरवनाथ उद्योग समूह यावर काय निर्णय घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती

दरम्यान काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्हा बँकेला कारखाना संदर्भात आगामी सात दिवस कोणताही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे तेरणा कारखाना पुन्हा एकदा संकटात आला असल्याचे बोलले जात आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारी भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेबाबत लातूर येथील काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, ही याचिका कोर्टाने निकाली काढताचं ट्वेंटीवन शुगरला डीआरटी कोर्टात जाण्यास सांगितले आहे. दरम्यान, सदर प्रकरणी तेरणा बचाव समितीने एक पत्रकार परिषदेत नाव न घेता जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला होता. 

“अमित देशमुख्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साधला जातोय निशाणा”

दरम्यान, ट्वेंटीवन शुगरने २० मिनिटे उशीर केला असल्याने त्यांना हा कारखाना दिला नसल्याचं बचाव समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेरणा बचाव समितीचे अजित खोत यांनी भीती व्यक्त करत म्हटलं आहे की, ट्वेंटीवन शुगर आणि भैरवनाथ यांच्या वादात हा कारखाना बंद राहतो कि काय असं खोत म्हणाले होते. तेरणा कारखाना हा सावंत यांच्याकडे जात असल्याने जनतेमधून अशी चर्चा आहे की, इथल्या काही स्थानिक राजकीय नेत्याचं राजकीय अस्तित्व हालत असल्यासारखे वाटत आहे त्यामुळे अमित देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचे काम सुरु आहे म्हणत खोत यांनी  स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, कारखाना चालू होण्याच्यामध्ये जर खोडा घातला तर येत्या काळात जनता बघून घेईल असं देखील खोत म्हणाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी