इंग्रजी शाळेत होतेय मनमानी; मनसेने केली 'ही' मागणी

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 18, 2020 | 22:41 IST

उस्मानाबादेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा विध्यार्थ्यांना ५ ते १० हजाराच्या दरम्यान शुल्क आकारत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. सदर शुल्क शाळेने घेऊ नये यासाठी सरकराला निवेदन देखील देण्यात आले

Demand made by Maharashtra Navnirman Sena
इंग्रजी शाळेत होतेय मनमानी; मनसेने केली 'ही' मागणी   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल
  • पालकांकडून घेतले जातायेत ५,००० ते १०,००० रुपये
  • लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ

उस्मानाबाद:  कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्यात आले असून, सर्वसामान्य नागरिकांची परस्थिती ही अत्यंत वाईट आहे. दरम्यान काहींची तर एका वेळेची खाण्याची भ्रांत आहे. त्यातच मुलांची शाळेची फीस म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावे लागेल. दरम्यान उस्मानाबाद-शहरासह  जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मनमानी कारभार करून पालकांना (Parents) विचारात न घेता फीमध्ये वाढ केली जात असून, इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळेमध्ये 'शुल्क निर्धारित समिती' स्थापन केलेली नाही तर फक्त दाखवण्यासाठी संबंधित जवळच्या पालकांना सोबत घेऊन बोगस समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत त्या आधारे शाळेमध्ये भरमसाठ फी (Fees) पालकांकडून घेतली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी केला आहे.

५,००० ते १०,००० रुपये घेतल्याचा मनसेचा आरोप

प्रवेश फी साठी पालकांकडून किमान ५,०००ते १०,००० रूपये घेतले जात आहेत. सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मोफत करण्यात यावे तसेच एक शाळेची फी प्रत्येकी ५,०००/- रू एवढी करण्यात यावी तसेच कोरोना व्हायरसमुळे देशात सरकारने लॉकडाऊन केले असल्यामुळे देशाच्या व राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे पालक वर्ग संकटात सापडला आहे. त्यांच्या हाताला कामे नाहीत, अधिकारी वर्गाची पगार कपात होत आहे. पालकांना नोकरी मिळत नाही कित्येक पालकांच्या नौकऱ्या गेल्या आहेत तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केवळ श्रीमंतांची मुले नसुन सर्वसामान्य कुटुंबातील तसेच गोरगरीबांची ही मुले शिक्षण घेत आहेत. याचा विचार करून शासनाने राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा एकसुत्री आराखडा तयार करावा व शाळांच्या मनमानी कारभारास निर्बंध घालावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे हा इशारा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक पालकांचे उत्पन्न बुडाले आहे, त्यामुळे अनेक पालक आर्थिक अडचणीत आले आहेत. दरम्यान अडचणीत आलेल्या विध्यार्थ्यांच्या पालकांची अडचण लक्षात घेऊन यंदा राज्यातील शाळांनी फी वाढ करू नये, अशी शिक्षण विभागाने भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. १५ जून पासून शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण मंत्र्यां वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिला होता. मात्र सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या विध्यार्थ्याकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्याने पालक वर्गात नाराजीचे वातावरण आहे. शाळा आकारत असलेले शुल्क लवकरात लवकर कमी करावे अशी मागणी देखील जोर धरत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी