बीड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे. त्यामुळे दोन समाजात दरी निर्माण होत असतानाच, बीडमध्ये सामाजिक सलोखा जपणारी बातमी समोर आली आहे. हरिनाम सप्ताहामध्ये एकाच मांडवाखाली हिंदुंसाठी प्रसाद तर मुस्लिम बांधवांसाठी रोजा सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असून, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जवळच्या पाटोदा या गावात हिंदू बांधवाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हरिनाम सप्ताहामध्ये रोजा धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक सलोखा जपणाऱ्या गावच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अधिक वाचा : अॅम्वेवर एमएलएम घोटाळ्याचा आरोप...757 कोटींची मालमत्ता जप्त
गेल्या काही दिवसांपासून मस्जिदवर असलेल्या भोंग्यावरून राज्यात काही राजकीय राजकीय पक्ष राजकारण करत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत असताना दिसत आहेत. परंतु, बीड जिल्ह्यातील पाटोदा या गावात अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रमजानच्या रोजेदारांसाठी पंगतीचे आयोजन करून गावकऱ्यांनी सणसणीत चपराक देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पाटोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये समाप्ती दिवशी पवित्र रमजानच्या महिन्यात रोजा असणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करून धार्मिक विद्वेषाला गावकरी कधीच बळी पडणार नाही, असा संदेशच देण्यात आला आहे.
अधिक वाचा : पीएफसाठी वाढू शकते पगाराची मर्यादा, ईपीएफओकडे आला प्रस्ताव
या सप्ताहात मुस्लिम बांधवांतर्फे नाश्ताची पंगत असते. मुस्लिम बाधवही या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. शिवाय सप्ताहाच्या आजोनामध्येही मुस्लिम बांधवांकडून सहभाग घेतला जात असतो. गावाचा हा सप्ता दोन्ही समाजातील लोक एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. दरम्यान, पाटोदा गाव विधायक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. गेल्या २६ वर्षांपासून गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. राम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत सप्ताह उत्साहात संपन्न होत असतो.
अधिक वाचा ; खिसा खाली करणारी बातमी, लिंबू महागला, धुळ्यात 200 रुपये किलो