'सावरकरांपेक्षा आता शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे', राजू शेट्टींचं वक्तव्य 

औरंगाबाद
Updated Dec 16, 2019 | 14:35 IST | अजहर शेख

Raju Shetty: इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे. 

farmers questions are more important now than savarkar, says raju shetty
'सावरकरांपेक्षा आता शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे', राजू शेट्टींचं वक्तव्य   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सावरकरांपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे, राजू शेट्टींचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, शेट्टींची मागणी
  • स्वाभिमान शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी राजू शेट्टींचा अनेक जिल्ह्यात दौरा

उस्मानाबाद: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने अक्षरश: रान उठवलं आहे. त्यामुळे आता याबाबत प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'सावरकरांपेक्षा आमचे प्रश्न मोठे आहेत. इथं आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. शेतकरी किड्या-मुंग्यासारखा मरतो आहे.' असं म्हणत राजू शेट्टी यांनी भाजपवर एकप्रकारे निशाणा साधला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी राजू शेट्टी सध्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत. सोमवारी राजू शेट्टी उस्मानाबादमध्ये आले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना राजू शेट्टी म्हणाले की, 'महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जो आहे त्यामध्ये शेतकरी कर्जमुक्ती आणि कृषी वीज पंपाच्या वीजेचा दर हे मुद्दे अतिशय वरच्या स्तरावर आहेत. त्यामुळे आमची देखील मागणी आहे की सरकारने ताबडतोब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.' 

याच वेळेस राजू शेट्टी यांना सावरकरांबद्दल विचारले असता ते असं म्हणाले की, 'सावरकरांपेक्षा आमचे प्रश्न मोठे आहेत. इथं आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. शेतकरी किड्या-मुंग्यासारखा मरतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचा आत्महत्या, सिंचनाच्या समस्या.. हे प्रश्न इतके मोठे आहेत की, त्यामानाने बाकीचे प्रश्न फारसे महत्त्वाचे नाहीत.' असं राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

दरम्यान, राजू शेट्टी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप याला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

राहुल गांधींनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं? 

दिल्लीच्या रामलीला मैदानावर शनिवारी काँग्रेसने भारत बचाओ रॅली आयोजित केली होती. त्यामध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, 'संसदेत शुक्रवारी भाजपचे खासदार म्हणत होते की, मी रेप इन इंडिया या वक्तव्यावर माफी मागावी. मी जे खरं बोललो त्यासाठी ही लोकं मला म्हणत आहेत की, मी माफी मागावी. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. मी जे खरं बोललो त्यासाठी मी कधीही माफी मागणार नाही. मी एकवेळ मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेस नेता यासाठी माफी मागणार नाही.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी