बीड जिल्ह्यात एकाच सरणावर ८ जणांचे अंत्यसंस्कार, कोरोनाचं भयाण वास्तव

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Apr 07, 2021 | 14:34 IST

Funeral of 8 persons one place in Beed district : एकाच सरणावर आठ जणांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral of 8  persons one place in Beed district
बीड जिल्ह्यात एकाच सरणावर ८ जणांचे अंत्यसंस्कार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोनाने मृत्यू झालेल्या  ८ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी
  • अंबाजोगाई तालुक्यात ४ दिवसात ५०० च्या आसपास रुग्ण पॉझिटिव्ह
  • औरंगाबादमध्ये अंत्यसंस्काराला जागा अपुरी

बीड : राज्यात कोरोनाचे रुग्ण (corona patient) दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.  कोरोना रुग्णवाढीचे रोजचे आकडे ५० हजाराच्या पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात (marathawada) कोरोनाने हाहाकार माजवला आहे. बीड जिल्ह्यात (Beed Corona cases) तर कोरोनाचा वाढता समूहसंसर्ग उच्छाद मांडत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले, तरी परिस्थिती अद्याप आटोक्यात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.  कोरोनाने मृत्यू पावलेल्या अनेकांचा एकाच सरणावर अंत्यविधी करावा लागत असल्याचे बीड जिल्ह्यात समोर आले आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या  ८ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी

अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर ८ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांमध्ये १ महिला असून सर्व मयत रुग्ण ६० वर्षापुढील नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या आठ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंबाजोगाई तालुक्यात ४ दिवसात ५०० च्या आसपास रुग्ण पॉझिटिव्ह

 अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत.  ४ दिवसात तब्बल ५०० च्या आसपास रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, मृतांचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. मात्र, काही नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे बीड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती?

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- २८४९१

एकूण मृत्यू- ६७२

एकूण कोरोना मुक्त- २५४३६

अॅक्टिव्ह रुग्ण- ४८९८

जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाचा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊन काळात एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. 

औरंगाबादमध्ये अंत्यसंस्काराला जागा अपुरी

औरंगाबादमध्ये टीव्ही सेंटर स्मशानभूमीत सर्वत्र पेटलेल्या चितांचे चित्र आहे. एक चिता विझण्याआधीच दुसरी चिता पेटत आहे. कोरोना मृतांचा आकडा वाढल्यामुळे स्मशानभूमीतही मरणासन्न स्थिती आहे. औरंगाबादच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी स्मशाभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेहांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. जागा मिळेल तिथे नातेवाईक अंत्यसंस्कार करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी