२६ जानेवारीनंतर पालकमंत्री गडाखांचा जिल्हा दौरा, घोषणांची पुनरावृत्ती, आश्वासनांची खैरात

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Apr 19, 2021 | 18:21 IST

gardian minister shankararao gadakh osmanabad tour: पालकमंत्री गडाख २६ जानेवारीच्या बैठकीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आज पहिल्यांदा अवतरले. कोरोना संकटात पालकमंत्री न आल्याने त्यांच्यावर कडाडून टीका केली जात होती

gardian minister shankararav gadakh osmanabad tour
२६ जानेवारीनंतर पालकमंत्री गडाखांचा जिल्हा दौरा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • २६ जानेवारीनंतर पालकमंत्री गडाख यांचा आज पहिला दौरा
  • उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
  • शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात (osmanabad district) आगामी काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालकमंत्री शंकरराव गडाख (minister shankararav gadakh) यांनी देखील भीती व्यक्त केली आहे. उस्मानाबादला सध्याचा कोटा १० ते ११ मेट्रिक टन आहे. मात्र रुग्ण वाढत असल्याने १७ ते १८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागणार आहे. जिल्ह्यात रेमडेसीवीरचा तुटवडा आगामी ३ दिवस कायम राहणार आहे. पालकमंत्री गडाख यांनी कोरोना आढावा बैठक घेतली यात अनेक बाबी उघड झाल्या आहेत तसेच त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. आजही शासकीय रुग्णालयात बेड नसल्याने रुग्णांवर स्ट्रेचर आणि खुर्चीवर उपचार केले जात आहेत. याप्रकरणी पालकमंत्री यांनी असे प्रकार घडल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या अनुषंगाने रोगप्रतिकारक गोळ्या उपलब्ध करण्याचेही आदेश दिले आहेत. 

२६ जानेवारीनंतर पालकमंत्री गडाख यांचा आज पहिला दौरा

पालकमंत्री गडाख २६ जानेवारीच्या बैठकीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आज पहिल्यांदा अवतरले. कोरोना संकटात पालकमंत्री न आल्याने त्यांच्यावर कडाडून टीका केली जात होती तर, भाजपने पालकमंत्री यांना उस्मानाबाद जिल्हा दौऱ्याचे जाहीर निमंत्रण दिले होते. मात्र, पालकमंत्री आज आल्यानंतर त्यांनी फक्त कागदोपत्री आकडेवारीवर आढावा बैठक घेतली. त्यामुळे उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला नसल्याने उस्मानाबादकरांच्या पदरी निराशा पडली आहे.

उस्मानाबादमध्ये कोरोनाची  स्थिती

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर १ लाख ८८ हजार ९४७ नमुने तपासले त्यापैकी २९ हजार ५५४ रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर २२.६४ टक्के आहे. जिल्ह्यात २२ हजार ९६६ रुग्ण बरे झाले असून ७८.६३ टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर ७२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून २.३४ टक्के मृत्यू दर आहे.

उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

दरम्यान, १८ एप्रिल रोजी उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक २४३ रुग्ण सापडले तर तुळजापूर ३८, उमरगा तालुक्यात ४७ रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या ५ हजार ८६३  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे.उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

 

शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या दररोजच्या आकड्याने ६००  रुग्णांचा टप्पा पार केला असून जिल्ह्यात ५ हजार ८६३  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या १५ दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोना संकटाचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. मागील वर्षीच्या कोरोना लाटेपेक्षा यावर्षीच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी