Arjun Khotkar: जालना: शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( arjun khotkar) हे गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच आज (29 जुलै) खोतकर हे थेट दिल्लीवरून जालना (Jalna) शहरात असलेल्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर जालनात दाखल होण्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी एक महत्वाचं भाष्य केलं आहे.
यावेळी अर्जुन खोतकर आपल्या 'दर्शना' बंगल्यासमोर येताच कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जोरदार आतिषबाजी करत खोतकर यांच स्वागत केलं. अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्याच बरोबर कुटुंबातील सदस्य यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अर्जुन खोतकर हे उद्या आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील खोतकर समर्थकांकडून एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार, यांच्या बरोबर अर्जुन खोतकर यांचाही फोटो लावत असल्याने खोतकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा निश्चित झाला असल्याचं ही बोललं जात आहे.
खोतकर यांच्यावर करण्यात आली होती ईडीची कारवाई
शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करण्यात आली होती. ईडीने तब्बल खोतकर यांची ७८ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
अधिक वाचा: कटू विषय पूर्णपणे संपवत एकमेकांसोबत हातमिळवणी केली, आता कोणाचाही शिरकाव होणार नाही - रावसाहेब दानवे
दरम्यान, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची २०० एकर जमीन, कारखाना इमारत आणि मशीन अशी मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
दिल्लीवारी नेमकी कशासाठी?
अर्जुन खोतकर हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होते. इथे त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील भेट झाली होता. शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी रावसाहेब दानवेंची भेट घेतली होती.
अर्जुन खोतकर यांच्या याच गाठीभेटींमुळे ते शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसं झाल्यास उद्धव ठाकरे हे इतर नेत्यांप्रमाणेच अर्जुन खोतकर यांची देखील हकालपट्टी करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.