कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी, चव्हाणांचा फोटो बॅनर वरून गायब! चर्चांना उधाण

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 19, 2020 | 20:03 IST

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमीत्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या बॅनरवर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचा फोटो नसल्याने चव्हाण समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

Internal factionalism in Congress, Chavan's photo disappears from banner
कॉंग्रेस मध्ये अंतर्गत गटबाजी, चव्हाणांचा फोटो बॅनर वरून गायब! चर्चांना उधाण   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मधुकरराव चव्हाण हे ५ वेळा तुळजापूर मतदार संघातून निवडून आले होते
  • उस्मानाबादेत कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी फोफावली
  • जाणीवपूर्वक खच्चीकरण होत असल्याची कुजबूज

उस्मानाबाद: १९९० पासून तब्बल ५ वेळा आमदार राहिलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) कॉंग्रेस पार्टीचे (Congress Party) जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) आता कॉंग्रेस पार्टीच्या पोस्टरमधून गायब असल्याचं दिसून आलं. पद गेल की किंमत पण कमी होते असाच काहीसा प्रकार इथे घडला असल्याचा दिसून येत आहे. दरम्यान मधुकरराव चव्हाण हे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. मधुकरराव चव्हाण पालकमंत्री असताना त्यांच्या बाजूला कार्यकर्त्यांचा गराडा पडत होता. मात्र २०१९ च्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत त्यांचा पराभव भाजपा उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला.

बॅनरवरून फोटो हटवला

राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचितत्य साधत उस्मानाबाद (Osmanabad) कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅनरवर जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचा फोटो नव्हता. दरम्यान फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पार्टीत मधुकरराव चव्हाण यांच्या गटातील कार्यकते नाराज असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

मला याची कल्पना नाही--- मधुकरराव चव्हाण

दरम्यान आमचे प्रतिनिधी अजहर शेख यांनी मधुकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,मला माझा फोटो बॅनरवरती टाकला नाही,याची कल्पना नाही. मी याचा विचारही करत नाही. मी सुरुवातीपासून कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे. कोण फोटो टाकेल किवा नाही, यामधून काही कमीपणा होत नसतो. हे चालत असत यामध्ये काही नवीन नाही अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.

काळ बदलल्याने पडला विसर

मधुकरराव चव्हाण हे ५ वेळा तुळजापूर (Tuljapur) मतदार संघातून विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. दरम्यान पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी कडवी झुंज दिली असून, मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचा झेंडा लावत गड कायम राखला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला कॉंग्रेस पक्षातील दिलेल्या योगदानाचा विसर काहींना पडला असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. 

जाणीवपूर्वक खच्चीकरान होत असल्याच्जी कुजबूज

दरम्यान मधुकरराव चव्हाण यांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण होत असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. त्यांना मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे देखील बोलले जात आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातील बॅनर वरून मधुकरराव चव्हाण यांचा फोटो न लावणे हा देखील त्यातला एक भाग आहे.

उस्मानाबादेत कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी फोफावली

थोडी थोडकी राहिलेल्या उस्मानाबाद कॉंग्रेस पक्षात अनेक गट तट आहेत. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात अंतर्गत गटबाजीने अनेक वर्ष काम करत असलेल्या तरुणांची वाताहत होत असून, गटबाजीच्या कारभाराला कंटाळून अनेक तरुण पक्षाला रामराम करत इतर पक्षात जात आहेत. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी