हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला, गाड्यांची तोडफोड

कन्नड अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास जाधव यांच्या समर्थनगर भागातल्या घरावर हा हल्ला करण्यात आला.

Harshwardhan jadhav home attack
हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला, गाड्यांची तोडफोड  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कन्नड अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
  • बुधवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास जाधव यांच्या समर्थनगर भागातल्या घरावर हा हल्ला करण्यात आला.
  • या हल्ल्यात जाधव यांच्या गाडीची आणि घरांच्या काचांची नासधूस झाली आहे.

कन्नड अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास जाधव यांच्या समर्थनगर भागातल्या घरावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जाधव यांच्या गाडीची आणि घरांच्या काचांची नासधूस झाली आहे. हल्लेखोरांनी जाधव याच्या गाड्यांची तोडफोड केली तसंच त्यांच्या घरावर दगडफेक केली. 

असं म्हटलं जात आहे की, ज्यावेळी हल्ला करण्यात आला त्यावेळी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं बोललं जातं आहे. मात्र याबाबत अधिकृत काही माहिती मिळालेली नाही. 

हल्ला करण्यात आला त्यावेळी हर्षवर्धन जाधव घरात नव्हते. प्रचारासाठी ते कन्नडमध्ये आहेत. मध्यरात्री तीन ते चार तरूण बाईकवरून आले आणि त्यांनी गेटबाहेरून दगडफेक केली. हल्ल्यात जाधवांच्या दोन गाड्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. 

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवसेनेविरूद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा रोष वाढला होता. निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी पिशोर इथल्या सभेत बोलताना जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्यावर निवडणूक आयोगानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली होती. 

हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःचा शिवस्वराज्य पक्ष स्थापन केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी काही दिवसांपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला होता. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघात शिवसेनेनं उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून संतोष कोल्हे रिंगणात आहेत. तसंच भाजपचे बंडखोर म्हणून किशोर पवार यांनीही उमेदवारी कायम ठेवल्यानं या मतदारसंघातली चुरस वाढली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी