Rajesh Tope | यापुढे होणाऱ्या परीक्षेच्या कंत्राटाबद्दल राजेश टोपे याचं महत्त्वाचे विधान , नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री

maharashtra health minister big statement : आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही, असंही टोपे यांनी म्हटलं आहे. आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे, असंही टोपे यांनी सांगितलं

maharashtra health minister big statement
यापुढील परीक्षेच्या कंत्राटाबद्दल राजेश टोपे याचं महत्त्वाचे विधान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही - टोपे
  • केंद्राने आता बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचं
  • आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे - टोपे

Rajesh Tope | हिंगोली : आरोग्य विभागाच्या आणि म्हाडाच्या परीक्षेच्या पेपरफुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी देखील याविषयी राज्य सरकावर टीका केली आहे. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे विधान केले आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर, यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका देखील राज्याचे राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे.

आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे – टोपे

आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही, असंही टोपे यांनी म्हटलं आहे. आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. आरोग्य भरतीतील परीक्षेबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुन्हा परीक्षेबाबत पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.

केंद्राने आता बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचं

१२ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून याबाबत निर्णय व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर, केंद्राने आता बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचं असून याबाबत आता निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी देखील राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात दररोज ६ ते ७ लाख लसीकरण होत असून लसीकरण वाढवण्यात येत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. राज्यात जवळपास १०० ओमायक्रोनचे रुग्ण आहे. राज्यात पहिला डोस ८७ टक्के लोकांनी घेतला असून दुसरा डोस ५७ टक्के लोंकांनी घेतला आहे. लोकांनी लसीकरणात सहभाग घेतला पाहिजे तरच लसीकरण पूर्ण होईल. असंही टोपे म्हणाले. 

भविष्यात तिसरी लाट ओमिक्रॉनचीच असेल

सध्या राज्यात कोरोनाचे १ हजार ४०० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून भविष्यात तिसरी लाट ओमिक्रॉनचीच असेल, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. यूरोपमध्ये कोरोना संसर्ग अधिक वेगाने पसरत असला तरी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गात मागील काही दिवसांत ज्या वेगाने वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याची आरोग्य यंत्रणादेखील याबाबत सतर्क झाली आहे. देशभरातच ओमायक्रॉनच्या संसर्गाबद्दल सतर्क राहण्याचा आणि कोरोना निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी