Raj Thackeray MNS: आज मनसेचं इंजिन कोणावर धडकणार? सभेचं, काऊंटडाऊन सुरू होण्याआधी कलम 144 लागू

औरंगाबाद
भरत जाधव
Updated May 01, 2022 | 08:08 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ (Marathwada Cultural Board) मैदानावर आज 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Raj Thackeray MNS
Raj Thackeray MNS: आज मनसेचं इंजिन कोणावर धडकणार?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर आज 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सभा.
 • सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल.
 • राज ठाकरेंच्या या सभेला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध करण्यात आला होता.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ (Marathwada Cultural Board) मैदानावर आज 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालं असून या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गुढी पाडव्याची सभा, त्यानंतर उत्तर सभा झाल्यानंतर राज्य सरकारमधील नेते बिधरली आहेत. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर हल्ला केल्यानंतर सरकारमधील नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याच्या सभेत राज ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करतील यात शंका नाही. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जिंतेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, संजय राऊत, मुख्यमंत्री या नेत्यांच्या अंगावर राज ठाकरे मनसेचं इंजिन धडकवतील. 

या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता राज ठाकरे आज कोणती गर्जना करणार मनसेचं इंडिन कोणावर धडकणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शहरात जमाव बंदी लागू करण्यात आली असली तरी मोठ्या संख्येने नागरीक राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित होतील अशी शक्यता आहे.  

राज ठाकरेंच्या या सभेला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांची परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आणि नंतर अखेर पोलिसांनी काही अटी-शर्तींच्या आधारावर सभेला परवानगी दिली. पोलिसांनी फक्त 15 हजार नागरिकांना सभेचं निमंत्रण द्यावं, अशी अट ठेवली आहे. तसेच सभेदरम्यान जात-धर्माशी संबंधित कोणतेही वादग्रस्त वक्तव्य आणि घोषणा केली जाऊ नये, असंही पोलिसांनी बजावलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांच्या दहा अटी 

 1. ) सभास्थळी आसनमर्यादा ही 15 हजार इतकी आहे. त्यामुळे 15 हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरलं जाईल.
 2. ) सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी यावरुन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
 3. ) सभा ही 1 मे रोजी संध्याकाळी साडेचार ते रात्री पावणे दहा वाजेच्या वेळेत आयोजित करण्यात यावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळत कोणताही बदल करण्यात येऊ नये.
 4. ) सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेत येताना किंवा जाताना कुणीही आक्षेपार्ह विधान, वर्तवणूक, घोषणाबाजी, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करनार नाही, याची दक्षता घ्यावी.
 5. ) सभेला येणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. वाहनांनी शहरात आणि इतर ठिकाणी वेगमर्यादाचे पालन करावे. सभेसाठी येताना-जाताना कार किंवा बाईक रॅली काढू नये.
 6. ) कार्यक्रमावेळी कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये आणि त्यांचं प्रदर्शन करू नये.
 7. ) स्वयंसेवक नेमण्यात यावे. त्यांची नावे, मोबाईल नंबर पोलिसांना द्यावे. तसेच कोणत्या गावातून किती नागरीक येणार, त्यांची संख्या आणि त्यांच्या वाहनांचा प्रवासाचा मार्गाविषयी माहिती पोलिसांना द्यावी.
 8. ) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाजाची मर्यादा असावी. त्या नियमांचा भंग केल्यास 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंडांची शिक्षा होऊ शकते.
 9. ) सभेदरम्यान बस, मेडिकल, वीज, रुग्णवाहिका अशा इत्यादी अत्यावश्यक सेवांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
 10. ) सभेसाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी