मुख्यमंत्र्यांकडे वचक असायला काय आहे!! ना खातं, ना अभ्यास: नारायण राणे

औरंगाबाद
Updated Jan 05, 2020 | 10:25 IST | अजहर शेख

मुख्यमंत्र्यांकडे वचक असायला त्यांच्याकडे काय आहे ना खात ना अभ्यास प्रश्न विचारला तर जयंत पाटलांकडे हात करतात आणि थोरातांकडे हात करतात अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

narayan rane criticize maharashtra cm uddhav thackeray osmanabad marathi news google
नारायण राणे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

उस्मानाबाद: भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणे हे अक्कलकोट आणि तुळजापूर येथे दर्शनासाठी परिवारासह आले होते त्यावेळी नारायण राणे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

नारायण राणे यांनी म्हटलं, सरकार स्थापन करून एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. अजूनपर्यंत या सव्वा महिन्यांमध्ये खाते वाटप झालं नाही, मंत्रालयात दालनं घेतली, बंगले घेतले पण कारभार सुरू नाही. जनतेचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न होत नाहीत, खातेवाटप न होताच अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही सुरुवात झाली आहे. हे सरकार मुळात दोन महिने पण टिकेल की नाही यात शंका आहे. या सरकारमधील मुख्यमंत्र्यांना एक टक्का पण प्रशासकीय कामाचा अनुभव नाही. त्यांची कुठलीही वचक नाही त्यामुळे ते अद्यापपर्यंत खाते वाटप ही करू शकले नाहीत आणि त्यांचं कोणी ऐकत ही नाही.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत दोन लाखापर्यंत कर्ज देतो म्हणाले आणि तसं परिपत्रक ही काढलं. या परिपत्रकात केव्हापासून कर्जमाफी देणार ती तारीख देखील नाहीये. याला परिपत्रक म्हणत नाहीत ही फसवाफसवी आहे आणि ना बजेटमध्ये आर्थिक तरतूद न करता शेतकऱ्यांना पैसे कसे देणार त्यामुळे हे सर्व बोगस आहे हे फसवणूक करणारे सरकार आहे आणि अल्पकालावधीच सरकार आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं.

तीन पक्ष एकत्र येणं हे गणितच चुकतय, त्यांची सर्व ध्येयधोरण प्रत्येक पक्षाची वेगवेगळी आहेत शिवसेनेची विचारधारणा ही हिंदुत्ववादी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पार्टीची विचारधारा ही सर्वधर्मसमभावाची आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र आले ते म्हणजे जनतेसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र आले आहेत ही सत्ता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे ती शिवसेनेचीही नाही आणि काँग्रेसची सुद्धा नाही. या मंत्रिमंडळावर काँग्रेस आणि शिवसेनेचे अस्तित्व देखील नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं. 

मुख्यमंत्र्यांकडे वचक असायला त्यांच्याकडे काय आहे ना खात ना अभ्यास प्रश्न विचारला तर जयंत पाटलांकडे हात करतात आणि थोरातांकडे हात करतात. कॅबिनेट घरातच आहे, स्वतः मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट त्यामुळे जुने शिवसैनिक नाराज होणारच असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. आता यावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी