इंदूरीकर महाराजांविरुद्ध बोलणाऱ्या तृप्ती देसाई, सक्षणा सलगर यांच्यावर वारकरी-शेतकरी भडकले 

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 13, 2020 | 18:59 IST

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि वारकरी पुढे आले आहेत.

nivrutti maharaj indurikar kirtan swabhimani shekari sanghatana tripti desai sakshana salgar ncp warkari
इंदूरीकर महाराजांविरुद्ध बोलणाऱ्या तृप्ती देसाई, सक्षणा सलगर यांच्यावर वारकरी-शेतकरी भडकले   |  फोटो सौजन्य: फेसबुक

उस्मानाबाद :  महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि वारकरी पुढे आले आहेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मुंडे यांनी तृप्ती देसाई आणि सक्षणा सलगर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पण हा प्रसिद्धी स्टंट असल्याचे सक्षणा सलगर यांनी प्रतिक्रिया दिली, तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या मुंडेंना तृप्ती देसाई यांनी खडेबोल सुनावले आहे. 

तृप्ती देसाई हे हिंगणघाटची घटना घडली होती, तेव्हा का आल्या नाहीत. तेव्हा आपण रस्त्यावर उतरण्याची भाषा का केली नाही. शेतकऱ्यांचे तरुण मुलं तमाशा पाहत होते, पण त्यांचे प्रबोधन करणाऱ्या निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्यामुळे ते आता कीर्तन पाहू लागले आहेत. आपण त्या महाराजांविषयी गुन्हे दाखल करायची भाषा करत असाल तर आम्ही शेतकऱ्यांचे मुलं  देखील रस्त्यावर उतरू असे आव्हान देखील भाऊसाहेब मुंडे यांनी दिले आहे. 

दरम्यान, मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  राष्ट्रवादीच्या पदाधिकारी  सक्षणा सलगर  यांनी घरातील मंडळीचा छळ केला आहे. त्यामुळे महिलांच्या विषयात बोलण्याचा  कसलाही नैतिक अधिकार नाही असेही भाऊसाहेब मुंडे यांनी म्हटले आहे. 

या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने सक्षणा सलगर यांची प्रतिक्रिया घेतली. त्यावर बोलताना  सक्षणा सलगर म्हणाल्या, की हा प्रसिद्धी स्टंट आहे.  माझ्यावर कसलाही गुन्हा दाखल नसल्याचे सांगत सलगर यांनी संबंधितांना कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले आहे.

तृप्ती देसाईचीही आमच्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया घेतली असताना मुंडे यांचा आक्षेप देसाई यांनी खोडून काढला.  हिंगणघाट प्रकरणावर मी वारंवार माझ्या प्रतिक्रिया टीव्ही चॅनेल्सवर देखील मांडल्या आहेत. इंदुरीकर महाराज हे महिलांचा अपमान करतात आणि जे मला प्रश्न विचारतात ते त्यांचं अनुकरण करून घरातल्या महिलांचा अपमान करतात का असे खडेबोल त्यांनी महाराजांची बाजू घेणाऱ्यांना सुनावले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी