रुग्ण सापडला एक, अन् लालपरीला लागला ब्रेक! या जिल्ह्यातील बस सेवा एकच दिवसात बंद

औरंगाबाद
अजहर शेख
Updated May 12, 2020 | 14:15 IST

तालुक्यातील सरणवाडी येथील तीस वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यानी दिली आहे.

One patient was found, Anlapari had a break!
रुग्ण सापडला एक, अन् लालपरीला लागला ब्रेक!या जिल्ह्यातील बस सेवा एकच दिवसात बंद.  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणुचा शिरकाव झाला
  • जिल्ह्याचे लॉकडाऊन करण्यात आले होते शिथिल
  • कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती करत होता पुणे-मुंबई प्रवास

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्हा आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ डेपोतून लालपरी रस्त्यावर देखील धावली. त्याबरोबर ८ ते २ वाजेपर्यंत शहरातील दुकाने खुली राहिल्याने नागरिकांची गर्दी दिसून आली. उस्मानाबाद जिल्ह्यात लालपरी धावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दिली होती. जिल्ह्यातून एकूण ६ बस आगारातून ११ फेऱ्या होतील. त्याचबरोबर बसेसच्या क्षमतेपेक्षा ५० टक्केच प्रवासी प्रवास करू शकतील असा नियम देखील लागू करण्यात आला होता. ११ मे रोजी सकाळी वेगवेगळ्या आगारातून  प्रवाशांसह बस रवाना करण्यात आले आहे.मात्र आता या बसेसना ब्रेक लागला आहे. कारण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये १ कोरोना बाधित आढळून आला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कुठल्याच आगारातून बस धावणार नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

परांडा तालुक्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.सोमवारी आलेल्या अहवालामध्ये या युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यानी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये ३८ दिवसानंतर कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परंडा तालुक्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश केवळ या आस्थापना सुरू राहणार

परंडा तालुक्यात कोव्हीड १९ ( कोरोना) चा रुग्ण आढळून आला आहे. त्यानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी परांडा तालुक्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत त्यानुसार तालुक्यात ठराविक आस्थापना चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालये , पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका , दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा - या आस्थापना, अन्न , भाजीपाला , दूध, किराणा पुरविणा - या आस्थापना सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीतच सुरू राहतील ), दवाखाने , वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने ,विद्युत पुरवठा . ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने , प्रसार माध्यमे , मिडीया ,अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी.आस्थापना चालू राहणार आहेत वरील सर्व आस्थापना सोडून बाकी सर्व आस्थापना १७ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेशा मध्ये म्हटले आहे.

जिल्ह्यामध्ये सुरुवातील दोन व तीन एप्रिल रोजी तीन रुग्णाना कोरोना विषाणुची लागण.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या सुरुवातीस जिल्ह्यातील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातही उमरगा भागातीलच हे तिन्ही रुग्ण होते, जिल्ह्याच्या इतर भागामध्ये सुदैवाने कोरोनाचा फैलाव झालेला नव्हता. शिवाय त्या तीनही रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडलेला नव्हता. त्यामुळे नागरीकही निर्धास्त झाले होते, आता मात्र जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणुचा शिरकाव झाला असून मागील महिनाभर कोरोनाच्या हाती न लागलेल्या परंडा तालुक्याने खाते उघडले आहे. तालुक्यात कोरोनाने खाते उघडल्याने त्या भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्याचा चांगलाच धसका जिल्ह्यामध्येही घेतल्याचे दिसून येऊ लागले आहे. 

जिल्ह्याचे लॉकडाऊन करण्यात आले होते शिथिल

दरम्यान, उस्मानाबाद अनेक दिवसापासून जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याकारणाने आजच जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते, मात्र एक रुग्ण आढळल्याने प्रशासकीय पातळीवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे.  

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती करत होता पुणे-मुंबई प्रवास

तालुक्यातील सरणवाडी येथील तीस वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यानी दिली आहे. वाशी व नवी मुंबई येथे शेतातील कलिंगड व खरबुज विक्रीसाठी तो घेऊन जात होता.याची विक्री करुन गावाकडे आलेल्या त्या युवकाला ताप येवू लागल्याने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मुंबईचा प्रवास असल्याने हॉस्पीटल प्रशासनाकडुन त्याची चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी