तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज, दररोज ४ हजार भक्तांना घेता येणार दर्शन

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Nov 15, 2020 | 16:37 IST

Online Booking And Offline Pass Mandir in Tuljapur: कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई,स्वच्छता व सॅनिटायझर व्यवस्था केली जाणार असुन दर दोन तासाला ५०० भक्तांना मुख दर्शन दिले जाणार.

Online Booking And Offline Pass Tujlabhavani Mandir in Tuljapur
तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज,पुजाऱ्यांना नसणार भक्तांसोबत प्रवेश   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दर दोन तासाला ५०० भक्तांना मुख दर्शन दिले जाणार
  • तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही
  • भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण 

उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरांसह (tuljabhavani temple) राज्यातील इतर मंदिरे व धार्मिक स्थळे भक्तांना दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. दरम्यान मंदिरे खुली करणायाच्या अनुषंगाने तुळजापूर (tuljapur) येथील मंदिरात तयारी करण्यात येत आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग (online booking) करावी लागणार असुन दररोज ४ हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे, त्यात १ हजार पेड दर्शन पास तर ३ हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.

दर दोन तासाला ५०० भक्तांना मुख दर्शन दिले जाणार

तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेल्या कार्यालयात मोफत पास पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात पहाटे ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंत या १६ तासांच्या काळात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई,स्वच्छता व सॅनिटायझर व्यवस्था केली जाणार असुन दर दोन तासाला ५०० भक्तांना मुख दर्शन दिले जाणार आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती,गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार भाविकांना तुळजाभवानी देवीचे मुखदर्शन दिले जाणार असुन दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंगसाठी वर्तुळाकार पट्टे ओढली जाणार आहे त्यासाठी किमान ६ फूट अंतर राखले जाणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही

पुजारी, महंत व मानकरी हे तुळजाभवानी देवीच्या सर्व धार्मिक विधी व पुजा सरकारने दिलेल्या कोविड नियमानुसार करतील. भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, सिंहासन पुजासह व इतर पूजा करता येणार नाही. मात्र मुख दर्शन घेता येणार आहे. सामुहिक आरती करता येणार नसुन तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही. मंदिर सुरू झाल्याने भाविकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळ ही गेली अनेक महिन्यांपासून बंद होती. मात्र राज्य सरकारने मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळ भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे. अनेक दिवसांपासून मंदिर बंद असल्याने देवीचे दर्शन घेता न आल्याची खंत भाविकांनी सांगितली असून, मंदिरे खुली करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत देखील भाविकांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी