दोन आठवड्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना लस मात्र, अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 21, 2021 | 09:41 IST

osmanabad collector corona positive : जिल्हाधिकारी यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतरही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत.

osmanabad collector corona positive
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना लस मात्र, अहवाल आला पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घ्यावी - दिवेगावकर
  • ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता.
  • मी पूर्ण सुट्टी न घेता वर्क फ्रॉम होम करणार आहे - जिल्हाधिकारी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Divegaonkar) यांचा कोरोना (corona) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कौस्तुभ दिवेगावकर यांनी २ आठवड्यापूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. मात्र, लस घेतल्यानंतर तब्बल २ आठवड्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. त्यामुळे लसीच्या प्रभावबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घ्यावी

जिल्हाधिकारी यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतरही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावाकर यांनी केले आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगत मी घेतली, तुम्ही पण घ्या असा प्रचार जिल्हाधिकारी यांनी केला होता.

ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावाकर यांना कोरोनाची साम्य लक्षणे जाणवत होती. अंगात थोडी ताप देखील असल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चाचणी केली होती आणि त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगीकरणात आहेत.

मी दोन आठवड्यापूर्वी लस घेतली आहे – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

नो मास्क नो एन्ट्री, मास्क तोंडावरून खाली ओढून बोलणे यावर कडक कार्यवाही आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या संदेशात नमूद केले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहा. मी दोन आठवड्यापूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते पण कोरोना विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या, असे आवाहन दिवेगावकर यांनी केले आहे.

मी पूर्ण सुट्टी न घेता वर्क फ्रॉम होम करणार आहे

“मी पूर्ण सुट्टी न घेता वर्क फ्रॉम होम करणार आहे. जेणेकरून महत्वाच्या विषयात खोळंबा होणार नाही. काल केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाची SOP प्राप्त झाली आहे. त्या SOP व राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपण सर्वजण मागील एक वर्षापासून COVID च्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे”, असेही त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी