सोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, कोरोनामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Mar 29, 2020 | 15:53 IST

कोरोना व्हायरसमुळे फुलांना मागणीच नसल्याने एका शेतकऱ्याने तीन एकरमधील झेंडूची फुले अक्षरश: टाकून दिली आहेत.

osmanabad farmer lose millions of rupees due to corona
सोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, कोरोनामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान  |  फोटो सौजन्य: Times Now

उस्मानाबाद: जगासह देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोना या महाभयंकर आजाराने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील तरुण शेतकरी नंदू वसंत मसे यांनी आपल्या शेतामध्ये तीन एकरवर झेंडू फुलाची बाग फुलवली होती. पण हीच फुलं आता खुडून त्यांना फेकून द्यावी लागली आहेत. 

झेंडूच्या फुलांच्या शेतीसाठी नंदू यांनी मशागत आणि फवारणीच्या औषधांवर लाखो रुपयांचा खर्च केला होता. यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह ही संपूर्ण बाग फुलवली होती. फुलाच्या विक्रीमधून चांगले उत्पन्न पदरात पडेल अशी अपेक्षा त्यांना होती. मेहनत केली तशी झेंडूची बाग देखील फुलांनी सजली होती. झेंडूना मोठी फुलेही लागली. मात्र मागील काही दिवसापासून कोरोना  व्हायरसने सगळीकडेच थैमान घातलेलं असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे आता बाजारपेठा देखील ठप्प झाल्या आहेत. 

बाजारपेठा ठप्प झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडूनही झेंडूची फुलांची खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मसे यांनी रंगवलेल्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. लाखो रुपये खर्च करून जोपासलेली झेंडूच्या फुलांची बाग मोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 
मसे यांनी रोजाने शेतमजूर महिला लावून तब्बल तीन एकरमधील झेंडूची फुले शेतात आणि बांधावर फेकून देत आहेत. फुलांना मागणी नसल्याने शेतकरी मसे यांचे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून फुल ना फुलाची पाकळी देण्याची मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

कोरोनामुळे देशातील सर्वच आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. ज्याचा सर्वाधिक परिणाम हा शेतकऱ्यांवर झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाने नुकसान सोसून उभं राहणाऱ्या शेतकऱ्याचं कोरोनाने कंबरडंच मोडून टाकलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी