निवडणुकीसाठी पहिल्यांदाच खासगी वाहतुकीचा आसरा , ७५ क्रुझरमधून साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर

osmanabad janata bank election : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या निवडणुकीतील साहित्य ने-आण करण्यासाठी वापरण्यात येतात. यावेळी मात्र, खासगी वाहनांचा वापर करावा लागला आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ७५ क्रुझरचे नियोजन करण्यात आले आहे. 

osmanabad janata bank election
पहिल्यांदाच खासगी वाहतुकीचा आसरा , ७५ क्रुझरमधून साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एसटी बंद असल्याने प्रथमच ७५ क्रुझरमधून साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले
  • १६ वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणुकीत रंगत वाढली आहे.
  • मतदान केंद्रांवर पोलिसांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती

उस्मानाबाद : पहिल्यांदाच खासगी वाहतुकीचा आसरा घेण्यात आला असल्याचे पहायला मिळाले आहे.  गेल्या १२ दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे एसटीच्या बसेसही बंद आहेत. एरवी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या निवडणुकीतील साहित्य ने-आण करण्यासाठी वापरण्यात येतात. यावेळी मात्र, खासगी वाहनांचा वापर करावा लागला आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ७५ क्रुझरचे नियोजन करण्यात आले आहे. 

एसटी बंद असल्याने प्रथमच ७५ क्रुझरमधून साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले

मराठवाड्यातील नामांकित बँकांपैकी एक असलेल्या व तब्बल १६ वर्षांपासून बिनविरोध निवडणूक होणाऱ्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची निवडणूक यंदा मात्र दोन पॅनलमुळे रंगतदार बनली आहे. प्रचारात दोन्ही पॅनलकडून दावे-प्रतिदावे आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, बीडसह कर्नाटकातील बीदर, अशा ५ जिल्ह्यातील १५४ मतदान केंद्रावर शुक्रवारी मतदान होईल. यासाठी ६७ हजार ८४२ मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी गुरुवारी शहरात निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले व एसटी बंद असल्याने प्रथमच ७५ क्रुझरमधून साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्या.

१६ वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणुकीत रंगत वाढली आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या गेलेली उस्मानाबाद जनता सहकारी बँक अल्पावधीत नावारूपाला आली असून, सुमारे ६७ हजार ८४२ सभासदांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या बँकेने विश्वास संपादन केला आहे. २००५ पासून बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असून, संचालक मंडळातील नागदे-मोदाणी यांच्याकडे बँकेची एकहाती सत्ता आहे. यंदा नागदे-मोदाणी पुरस्कृत उस्मानाबाद जनता सहकारी बँक विकास पॅनलच्या विरोधात भाजपचे सुधीर पाटील यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिले असून, त्यामुळे १६ वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणुकीत रंगत वाढली आहे. 

मतदान केंद्रांवर पोलिसांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती

प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचारी असून यात एक केंद्राध्यक्ष, चार पर्यवेक्षक आणि एक शिपाई असेल. तीन पोलिसांचे पथक असून यात दोन पुरुष तर एक महिला असेल. १५४ बूथवर ९२५ कर्मचारी राहणार असून २५ कर्मचारी राखीव आहे. कर्मचाऱ्यांना गुरुवारी प्रशिक्षण देत त्यांना निवडणूक साहित्य वाटप केले. ३ वाजता सर्वजण नियुक्त केंद्राकडे रवाना केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी