उस्मानाबादमध्ये बुडत्या राष्ट्रवादीची नवी खेळी 

औरंगाबाद
Updated Jan 14, 2020 | 12:12 IST | अजहर शेख

 उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी युवका

osmanabad ncp rana jagjeetsinh mehboob shaikh ncp yuva political news in marathi
उस्मानाबादमध्ये बुडत्या राष्ट्रवादीची नवी खेळी   |  फोटो सौजन्य: Times Now

उस्मानाबाद :  उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी युवकांची टीम मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मेहबूब शेख यांनी युवक जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील युवकांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत.
 
शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे राणा जगजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. राणा जगजीत सिंह यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बुरे दिन सुरू झालेत.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या संस्था राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली.  एवढच नव्हे तर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ५६ सदस्य असलेल्या जिल्हापरिषदेतील २६ सदस्य निवडून आणले होते आणि जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली होती.

भाजपात प्रवेश केल्यानंतरही  राष्ट्रवादीचे १७ सदस्य सोबत घेत काही दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांनी आपल्याच गटातील सदस्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. राणा जगजितसिंह पाटील गटाचा अध्यक्ष झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही सदस्याचे सभापती होण्याचे स्वप्न देखील भंगले आहे.

जिल्हा परिषद राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे गेल्याने राष्ट्रवादी आपला गड राखण्यात अपयशी ठरली आहे. हा अपयश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे.
राष्ट्रवादीला पहिले अच्छे दिन आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टीम मैदानात उतरणार आहे. तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. नवीन येणारा युवक जिल्हाध्यक्ष राणा जगजीतसिंह पाटलांना कितपत मात देऊ शकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पुन्हा घराणेशाही नको

राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्यापदी नातलगांना संधी दिल्याने सामान्य कार्यकर्त्याची परवड होत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. परंतु आगामी होणाऱ्या युवक जिल्हाध्यक्षपदी पवार कुटुंबातील नातलगांनाच संधी देण्याऐवजी सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करावा असे आवाहन काही कार्यकर्त्यांमार्फत मेहबूब शेख यांना करण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे पवारांच्या नातलगांना संधी देतील का? सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी