अखेर शिवसेना भाजपचं जुळलं, पुन्हा युतीने राजकीय वर्तुळात खळबळ 

 शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीने राणा जगजितसिंह पाटील यांना जिल्हा परिषदेवर आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं आहे.

osmanabad zp president election bjp shiv sena yuti political news in marathi
अखेर शिवसेना भाजपचं जुळलं, पुन्हा युतीने राजकीय वर्तुळात खळबळ  

थोडं पण कामाचं

  • शिवसेना आमदारांचाच महाविकास आघाडीला खोडा!
  •  राष्ट्रवादी-शिवसेनेच्या मदतीने जिल्हा परिषदेवर राणा रणजितसिंह पाटील यांचे पुन्हा वर्चस्व.
  • तानाजी सावंत यांनी बंडखोरी करून आपल्या पुतण्याला केले जिल्हा परिषद उपाध्यक्ष

अजहर शेख, उस्मानाबाद :  राज्याचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्या मदतीने भाजपाचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजप युतीचा झेंडा रोवला आहे.  शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीने राणा जगजितसिंह पाटील यांना जिल्हा परिषदेवर आपलं वर्चस्व कायम ठेवता आलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला असला तरी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामोडी घडवत ही जिल्हा परिषद भाजप आणि शिवसेनेने ताब्यात घेतले आहे

राज्यात जरी भाजपाला वेगळं टाकत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात सत्ता स्थापन केली.  उद्धव ठाकरें यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचा फॉर्म्युला निर्माण केला. आता राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा फॉर्म्युला वापरून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मात्र उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांनी आपले समर्थक सदस्य आणि पुतणे धनंजय सावंत यांना भाजपसोबत पाठवून महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा युतीच्या उमेदवार अस्मिता कांबळे यांना 30 मते तर काँग्रेस आणि तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 20 मते पडली आहेत.

तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्याने उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य नाराज होते.  त्यांनी भाजपसोबत जिल्ह्यात  युती करण्याचा आग्रह धरला, सदस्यांच्या आग्रहाला होकार देत तानाजी सावंत यांनी आपल्या पुतण्याला भाजपच्या मदतीने थेट उपाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवला. त्यात त्यांना उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची साथ मिळाली. आम्ही बंडखोरी केली नसून ज्ञानराज चौगुले सुजितसिंह ठाकूर  राणा जगजितसिंह आणि तानाजी सावंत हे विकास करू शकतात. या विकासालाच लक्षात ठेवून आम्ही युती केली असल्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी सांगितले.

आतापर्यंत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे २६ सदस्य आणि भाजपाचे ४ सदस्य घेऊन राणा पाटलांनी कारभार हाकला. पण राणा पाटील यांचा भाजप प्रवेश झाला आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली.  राष्ट्रवादीतील २६ पैकी १६ सदस्य हे राणा पाटील समर्थक आहेत. याच्या जोरावर राणा पाटील यांनी ही जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना तानाजी सावंत, सुजित ठाकूर, ज्ञानराज चौगुले, अपक्ष आणि काँग्रेसचे तीन सदस्यांची साथ मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या समर्थक राष्ट्रवादीच्या सदस्य अस्मिता कांबळे यांना अध्यक्षपदी बसवले आहे. अस्मिता कांबळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिपद न दिल्याने तानाजी सावंत नाराज झाले होते. त्यांनी भाजपाला साथ दिली तर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षाचा आदेश डावलत भाजपाला साथ दिली. यामुळेही सत्ता स्थापन झाली पण या बंडखोर सदस्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी