पैठण : घरातील पुरुषांना दोरीने बांधून त्यांच्यासमोरच दरोडेखोरांनी केला दोन महिलांवर सामूहिक बलात्कार

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Oct 21, 2021 | 16:25 IST

पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पैठण क्राईम) असलेल्या तोंडोळी येथे मंगळवारी रोजी मध्यरात्री सात दरोडेखोरांनी शेती वस्तीवर राहणाऱ्या एका परप्रांतीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Paithan Robbers raped two women, tied up men and raped  them in front of mens
पैठण : दरोडेखोरांचा दोन महिलांवर सामूहिक बलात्कार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिलांवर बलात्कार केल्यानंतर पैसे घेऊन दरोडेखोर पसार झाले.
  • सहा ते सात दरोडेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह कुटुंबाला मारहाण
  • अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथक स्थापन करण्यात आले आहेत.

पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पैठण क्राईम) असलेल्या तोंडोळी येथे मंगळवारी रोजी मध्यरात्री सात दरोडेखोरांनी शेती वस्तीवर राहणाऱ्या एका परप्रांतीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने शेतवस्तीवर मंगळवारी रात्री धुमाकूळ घातला. एका घरातील कुटुंबीयांना अमानुष मारहाण करत घरातील पुरुषांना बांधून त्यांच्यासमोर महिलांवर अत्याचार केला. 

दरम्यान घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्यासह पैठण पाचोड बिडकीन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पोहचून घटनेची माहिती घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तोंडोळी गावालगत औरंगाबाद येथील मगरे यांची शेती वस्ती आहे. या ठिकाणी राजू टेमा बारेला (रा. बलोली जि. मध्यप्रदेश) यांच्यासह तीन परप्रांतीय परिवार मजूर शेतीकामासाठी ठेवण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणे हे कुटुंब शेती वस्तीवर झोपेल असताना सहा ते सात दरोडेखोरांनी हातामध्ये प्राणघातक शस्त्रांसह त्यांना मारहाण केली. महिलांवर बलात्कार करत पैशांची लुट केली. 

 बाळंतीण महिलेवर बलात्कार

सात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने शेतवस्तीवर असलेल्या तीन कुटुंबियांवर रात्री हल्ला केला. एका घरातील कुटुंबीयांना अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून त्यांच्यासमोर दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. यातील एक पीडिता दोन महिन्यांची बाळंतीण आहे. 

कामासाठी मध्य प्रदेशातून आलेले मजूर तोंडोळीला स्थायिक 

तोंडोळी शिवारातील एका शेतात मध्य प्रदेशातील कुटुंब राहते. शेतमजूर असलेले हे कुटुंब काम करून उदरनिर्वाह भागविते. कुटुंबात सात सदस्य आहेत. मंगळवारी रात्री ते जेवण करून घरात झोपी गेले. मध्यरात्री सात दरोडेखोरांनी शेतवस्तीवर हल्‍ला केला. दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना कुर्‍हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. त्यांचे हात-पाय बांधून खोलीत डांबले. त्यानंतर दोन महिलांवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी दरोडेखोरांनी 50 ते 60 हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पीडितेवर सामूहिक बलात्कार

सात दरोडेखोरांपैकी तिघांनी दोन महिलांवर अत्याचार केला. एका पीडितेवर एकाने आणि दुसर्‍या पीडितेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. महिलांसह सर्वच कुटुंबीयांनी दयेची याचना केल्यानंतरही त्यांना पाझर फुटला नाही. तिघे अत्याचार करीत असताना त्यांच्यासोबत असणारेइतर दरोडेखोर आपल्याच साथीदारांना शिवीगाळ करीत होते.  दरम्यान अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथक स्थापन करण्यात आले आहे. यासह या दरोडेखोरांनी लोहगाव परिसरात एका शेतावर जाऊन येथील काही नागरिकांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचा येथील नागरिक सांगत आहे. दरोडेखोरांचा गोंधळामध्ये तोंडोळी वस्तीवर राहणारे नागरीक किरकोळ जखमी झाले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी