विधानपरिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडेची होती वेगळी रणनीती, भाजपने ऐनवेळी बदलला डाव

औरंगाबाद
अजहर शेख
Updated May 17, 2020 | 22:13 IST

कार्यकर्त्यांची नाराजी पाहून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसाठी ट्विट केले होते. त्यानंतर दुसरे ट्विट करत एक चित्र काढून त्याला शून्यातून सुरुवात करत असल्याचं कॅप्शन दिलं होतं.

Pankaja Munde had a different strategy during the Legislative Council elections! BJP changed the innings at the right time.
पंकजा मुंडेची होती वेगळी रणनीती, भाजपने ऐनवेळी बदलला डाव  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पंकजा मुंडे यांच्या मुळेच चौथा उमेदवार बदलला
  • पंकजा मुंडेंनी कागदपत्रांची केली होती जुळवाजुळव.
  • दोन कराडांना उमेदवारी देत पंकज यांची केली कोंडी

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभा २०१९ निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांचा पराभव त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी केला होता. विधानसभा पराभव पचवताना पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची ओढ लागली होती असं म्हणावं लागेल. कारण विधान परिषदेची नाकारलेली उमेदवारी पंकजा मुंडे यांच्या फार जिव्हारी लागली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे या ट्वीट करत स्वतः स्वतःलाच सावरत आहे. असं दिसत आहे. 

हा डाव म्हणायचं का?

दरम्यान, पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देण्याचा मोठा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला होता. पंकजा मुंडे यांना टाळणे हे पक्षाच्या अंगावर येणारी गोष्ट होती. उमेदवारी न मिळाल्याने पंकजा नाराज होत्या, मात्र त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली नाही. मात्र पंकजा मुंडे यांनी भाजपाला धक्का दाखवण्याची पूर्ण तयारी केली होती. हे मात्र तितकंच खरं.

असा होता पंकजा मुंडेचा प्लॅन?

विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे ह्या नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी उघडपणे जरी बोलून दाखवली नसेल, मात्र ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी दाखवली होती. विधान परिषदेच्या चौथ्या जागेसाठी यांना उमेदवारी दिली होती. भाजपाला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी थोड्या मतांची गरज होती. पंकजा मुंडे यांनी चौथी जागा असुरक्षित करण्याचे नियोजन केले होते. पंकजा मुंडेसोबत भाजपाने केलेल्या विश्वासघाताने चौथी जागा पाडून पंकजा मुंडे यांनी उत्तर देण्याचे ठरवले होतं? अशी विविध प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. 

१३ ते १४ आमदार करणार होते क्रॉस वोटिंग?

अनेक वर्षापासून पंकजा मुंडे यांनी भाजपात आपले स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे पक्षामध्ये आणि जनतेत त्यांची चांगली क्रेज आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात १३ ते १४ आमदारांचा मानणारा गट आहे. हा १३ ते १४ आमदारांचा मानणारा गट क्रॉस वोटिंग करणार असल्याची जोरदार चर्चा होती. 

थोरातांनी खडसेंना दिली होती ऑफर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची ऑफर दिली होती. एकनाथ खडसेंनी ऑफर स्वीकारली असती तर, ते आघाडीचे सहावे उमेदवार असते. खडसे सहावे उमेदवार असते तर क्रॉस वोटींग झाली असती. अशी माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती.

पंकजा मुंडे यांच्यामुळेच चौथा उमेदवार बदलला

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाला आपला चौथा उमेदवार बदलावा लागला याचे कारण पंकजा मुंडे असल्याचे बोलले जात आहे. पंकजा यांनी आपली पूर्ण रणनीती आखली होती. पंकजा मुंडे यांनी रचलेले प्रतिडावपेच पाहूनच भाजपाने रमेश कराड यांना उमेदवारी दिली असल्याचे समोर आले आहे.

पंकजा मुंडेंनी कागदपत्रांची केली होती जुळवाजुळव.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणारी निवडणूक लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली होती. विधान परिषदेवर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची नावे निश्‍चित मानली जात होती. उमेदवारी खात्रीलायक असल्याचे समजले जाणाऱ्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीची तयारी करत कागदपत्रांची जुळवाजुळव देखील केली होती. यातील एक पत्र देखील सोशल मीडियावर वायरल झालं होतं. मात्र पंकजा मुंडेना उमेदवारी नाकारत पक्षाने मोठा धक्का दिला.

पंकजा मुंडे यांच्यामुळे बदलले चित्र

पंकजा मुंडे यांची उमेदवारी कापल्यानंतर मुंडे समर्थक नाराज झाले होते. कार्यकर्त्यांची नाराजी पाहून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसाठी ट्वीट केले होते. त्यानंतर दुसरे ट्वीट करत एक चित्र काढून त्याला शून्यातून सुरुवात करत असल्याचं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर काही वेळातच अजित गोपछेडे यांना दिलेली उमेदवारी काढून घेत रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली होती. या सर्व हालचाली पंकजा मुंडे यांच्यामुळेच झाली असल्याची माहिती राजकीय जाणकारांकडून पुढे येत आहे.

दोन कराडांना उमेदवारी देत पंकजा यांची केली कोंडी

विधान परिषदेच्या निवडणुकीत अचानकपणे रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली. काही महिन्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत देखील भाजपाने डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेवर खासदारकी दिली. वंजारी समाजाचे असणारे दोन्ही कराड यांना जवळ करत भाजपाने अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांची कोंडी केली असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी