पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?, 'त्या' ट्वीटमुळे तुफान चर्चा! 

Pankaja Munde Tweet: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक करणारं एक ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे. पंकजा मुंडे यांच्या या या ट्वीटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

pankaja munde
पंकजा मुंडे  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन केलं शरद पवार यांचं कौतुक
  • पंकजा मुंडेच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा
  • गेल्याच आठवड्यात एकनाथ खडसेंनी केला भाजपला रामराम

मुंबई: भाजपच्या माजी मंत्री आणि राज्यातील मोठ्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल (मंगळवार) केलेल्या एका ट्वीटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 'पवार साहेब hats off... कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना याचे अप्रूप वाटले... पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे.' असं ट्वीट काल पंकजा मुंडे यांनी केलं होतं. मात्र, आता त्यांच्या याच ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात मात्र एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील राजकारणातून पंकजा मुंडे यांना पक्षाने सोयीस्कररित्या बाजूला सारलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे पंकजा मुंडे या देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर तर नाहीत ना? अशी एकच चर्चा सुरु झालेली आहे. 

मागील आठवड्यातच एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरं तर राज्याच्या पातळीवर भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध भाजपमध्ये असंतोष वाढू लागला आहे. त्यात खडसें यांनी देखील आपण फक्त फडणवीसांमुळेच पक्ष सोडत असल्याचं वक्तव्य केलं. दुसरीकडे आता पंकजा मुंडे यादेखील पक्षात अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं त्यांनी केलेलं कौतुक यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

त्यातच पंकजा मुंडे यांच्या ट्वीटचं कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील केलं आहे. 'धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.' असं म्हणत रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं की, या निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता मिळवेल. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पक्षात कुणीही विरोधी भूमिका घेताना दिसलं नाही. पण २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राजकीय समीकरणं बदलली आणि भाजपला थेट विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यामुळे आता हळहळू फडणवीस यांच्याविरोधात पक्षांतर्गत गट सक्रिय झाला आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांच्यासारख्या बड्या नेत्याने शरद पवार यांचं केलेलं कौतुकाचं ट्वीट हा नक्कीच योगायोग नसावा. मात्र, असं असलं तरीही पंकजा मुंडे यांनी याआधी अनेकदा म्हटलं आहे की, आपण भाजप सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे आता त्यांनी केलेलं हे ट्वीट हा एक दबाव तंत्राचा भाग तर नाही ना? अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी