परभणी : राज्यात सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त भाजप(BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसरीकडे अनेक विषयांवर भाष्य करत ठाकरे सरकारचा समाचार घेतला. त्या व्यंकटेश मंगल कार्यालयात विधानपरिषद पदवीधर निवडणुकीचे (graduation election) उमेदवार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. लोकांची महाविकासआघाडी सरकारवर प्रचंड नाराजी आहे. या सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आले आहेत. यांचे जनतेच्या हिताच्या निर्णय घेण्याचे उद्दीष्ट आहे, असे वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.
आमदार सतीश चव्हाण यांनी कधीच पदवीधरांचा प्रश्न मांडला नाही. ते कुठेही मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले नाहीत. अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते.
राज्यात पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका लागल्या आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भारतीय जनता पार्टीकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज नेते औरंगाबाद मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आत आहेत. पंकजा मुंडे यांनीदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण तसेच सरकारवर टीका केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) यांनी चुलत बंधू तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (NCP Leader Dhananjay Munde) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. भाषणात पंकजा मुंडे म्हणल्या, बीड जिल्ह्यात आणलेल्या निधीचा साधा नारळ सुद्धा या लोकांना फोडता आलेला नाही. जोरदार टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणाचाही कोणाशी ताळमेळ नाही. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असा दावा देखील पंकजा मुंडे यांनी केला आहे.