पुणे : काही दिवासांपूर्वी राज्यात आरोग्य विभागाच्या गट 'क' गटाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता आणखी दोन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर अटक करण्यात आलेला व्यक्ती हा पेपरफुटी प्रकरणात एजंट असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान , आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात आरोपी असलेला संजय सानप याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी गायकवाड आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान , दुसरीकडे, पुणे पोलिसांची काही पथके दिल्ली येथे दाखल झाली आहेत. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टीईटी परीक्षा पेपर (TET Exam) फुटी घोटाळ्याप्रकरणी आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकर याला देखील अटक करण्यात आले आहे. जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा लायझिंग अधिकारी सौरभ त्रिपाठीला पुणे पोलिसांनी लखनऊमधून अटक केली. त्याचबरोबर , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांची नावे सामोर आल्यानंतर पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या आणि म्हाडाच्या परीक्षेच्या पेपरफुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी देखील याविषयी राज्य सरकावर टीका केली आहे. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे विधान केले आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर, यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका देखील राज्याचे राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे.
आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही, असंही टोपे यांनी म्हटलं आहे. आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. आरोग्य भरतीतील परीक्षेबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुन्हा परीक्षेबाबत पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.