पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; मंत्री संजय राठोड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 18, 2021 | 17:19 IST

pooja chavan sucide case : बंजारा समाजातील विविध संघटनांनी संजय राठोड यांना समर्थन दिले असून, संजय राठोड यांच्या समर्थनात फोटोला वसंतराव नाईक चौकी येथे दुग्धाभिषेक देखील करण्यात आला आहे.

pooja chavan sucide case
मंत्री संजय राठोड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बहुजन नेत्यांना बदनाम करून षड्यंत्र पूर्व खच्चीकरण केले जात आहे
  • महाराष्ट्रामध्ये नेत्यांची आवाज काढण्याची कमी नाही त्यामुळे रेकॉर्डिंग खोटी असण्याची दाट शक्यता
  • महंतांनी संजय राठोड यांचे समर्थन केले

औरंगाबाद : पूजा चव्हाण आत्महत्या (pooja chavan sucide case) प्रकरणात मंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांचे नाव आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. दरम्यान, संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भारतीय जनता पार्टी देखील आक्रमक होत राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहे. तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी देखील करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. त्यातच संजय राठोड यांना समर्थन देखील मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. बंजारा समाजातील विविध संघटनांनी संजय राठोड यांना समर्थन दिले असून, संजय राठोड यांच्या समर्थनात फोटोला वसंतराव नाईक चौकी येथे दुग्धाभिषेक देखील करण्यात आला आहे.

बहुजन नेत्यांना बदनाम करून षड्यंत्र पूर्व खच्चीकरण केले जात आहे

मागील काही काळा पासून बहुजन नेत्यांना बदनाम करून षड्यंत्र पूर्व खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. हे फक्त संजय राठोड यांना मिटवण्याचे षड्यंत्र नाही तर संपूर्ण बहुजन समाजाच्या नेतृत्वाला कमजोर करण्याची चाल आहे मात्र आता बहुजन हा डाव यापुढे खपवून घेतला जाणार नाही असं यावेळी आंदोलन कर्त्यांनी म्हटलं आहे.

रेकॉर्डिंग खोटी असण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये नेत्यांची आवाज काढण्याची कमी नाही त्यामुळे रेकॉर्डिंग खोटी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याचं देखील कार्यकर्त्यांच्या वतीने बोललं जात आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या या सर्व रेकॉर्डिंगमध्ये कुठेही संजय राठोड यांचे नाव नसून, त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येईपर्यंत संबंधिताची बदनामी थांबवावी असही ते म्हणाले.

महंतांनी संजय राठोड यांचे समर्थन केले

पूजा चव्हाणने केलेली आत्महत्या दुर्दैवी असून पूजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र ऑडिओ क्लिपच्या नावाखाली समाजाचे नेते संजय राठोड यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राजकीय वळण लागले आहे. दरम्यान सदर प्रकरण चांगलंच गाजत असून विरोधक मात्र, गंभीर आरोप करीत आहेत. परंतु, महंतांच्या पार पडलेल्या बैठकीत संजय राठोड यांचे समर्थन सर्वच महंतांनी केले आहे. सर्व समाज संजय राठोड यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येणार असून देशातील संपूर्ण समाज राठोड यांच्या पाठीशी आहे, असं बाबूसिंग महाराज धर्मपिठाधीश्वर यांनी सांगितलं.

निवेदन देऊन विरोधकांचा निषेध नोंदवणार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण इथेच थांबवावे. जर सदर प्रकरण इथेच थांबले नाही तर राज्यातील सर्वच बंजारा समाज रस्त्यावर उतरून तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना १५, १६, १७ फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन विरोधकांचा निषेध नोंदवणार असल्याचं सुनील महाराज यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी