वर्धा : सध्या राज्यभर पेपरफुटीचा घोटाळा गाजत आहे. पेपरफुटी घोटाळ्यात अनेक जणांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र, या घोटाळ्यात आरोपी असलेल्या डॉ. प्रितीश देशमुख याच्या बद्दल एक नवीन खुलासा समोर आला आहे. त्याचबरोबर डॉ. प्रितीश देशमुखचे ( pritesh Deshmukh) वर्धा (wardha) कनेक्शन देखील समोर आले आहे. डॉ. प्रितीश देशमुख याला राजकारणात खूप रसं असल्याचं बोललं जातं आहे. त्याचबरोबर त्याला विधान परिषदेचं आमदार देखील व्हायचं होतं अशी माहिती मिळाली आहे. काही वर्षांत त्याचं बदललेलं राहणीमान परिसरातील रहिवाशांकरिता कुतुहलाचं ठरलं होतं. डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी असून त्याच्याशी संबंधित विविध चर्चांना उधाण आले आहे.
मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असलेले देशमुख कुटुंब वर्ध्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आहे. तर , प्रीतीश दिलीप देशमुख याचे वर्धा शहरातील सेवाग्राम मार्गावरील स्नेहलनगर भागात घर आहे. त्याचे वडील वर्धा शहरालगतच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक होते. अत्यंत हुशार व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. ते अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते. दरम्यान, प्रितीश देशमुख याने वर्धेतही मोठी माया गोळी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर त्याला राजकारणात मोठी रुची असल्याचीही बातमी समोर येत आहे. मुंबईवारीवर असलेल्या वर्धेच्या नेत्यांना त्याने विधान परिषद आमदार बनण्याची इच्छा असल्याचंही बोलून दाखवली असल्याचीही माहिती पुढे येत आहे.
वर्ध्यात कुठल्याही राजकीय मंडळीशी प्रीतीशचे विशेष संबंध नसले तरी काही मंडळींनी पुलगाव व चांदूर (रेल्वे) भागातून नोकरीच्या निमित्ताने प्रीतीशकडे संपर्क साधला होता. त्यांच्याकडून त्याने माया जमवली असावी, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
डॉ.प्रीतीश देशमुख हा दोन महिन्यातून वर्ध्यातील त्याच्या निवासस्थानी यायचा. आठ ते दहा दिवस राहून तो परत पुण्याला जायचा, अशी माहिती त्याच्या निवासस्थालगतच्या नागरिकांनी बोलताना दिली आहे. प्रीतीश देशमुख याचे स्नेहलनगर परिसरात मोठे आलिशान ‘राजवाडा’ नामक निवासस्थान आहे. त्याने घरासमोरील एका लेआऊटमध्ये तब्बल ८ हजार स्क्वेअरफूट जागा खरेदी केल्याची चर्चा आहे. मात्र, त्याने अल्पावधीतच ऐवढी माया कशी जमविली, याबाबत नागरिकही आर्श्चय व्यक्त करीत होते.