शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला

औरंगाबाद
Updated Oct 16, 2019 | 13:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Omraje Nimbalkar: उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात ही घटना घडली आहे. 

Omraje Nimbalkar
ओमराजे निंबाळकर (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला
  • पोलिसांनी हल्लेखोराला केली अटक
  • उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात घडला प्रकार
  • हल्ल्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला किरकोळ दुखापत

Omraje Nimbalkar: उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या नायगाव पाडोळी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सुदैवाने ओमराजे निंबाळकर यांना दुखापत झालेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कामात असताना एका तरुणाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. प्रचारात असताना नागरिकांची मोठी गर्दी जमली होती त्या गर्दीमधून एक तरुण पुढे आला आणि त्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांना हात मिळवला. त्यानंतर दुसऱ्या हाताने त्याने आपल्याकडील चाकू काढून ओमराजे यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण ओमराजे यांनी चाकू पाहिला आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीच्या हातातील चाकू ओमराजे निंबाळकर यांच्या हातातील घड्याळावर लागला. या हल्ल्यात ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

हल्ला केल्यानंतर त्या आरोपीने जवळच असलेल्या एका दुचाकीवर बसून तेथून पळ काढळा. आरोपी तरुणाने हा हल्ला का केला त्यामागचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. हल्ला करुन फरार झालेल्या आरोपी अजिंक्य टेकाळे याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, भरदिवसा एका खासदारावर अशा प्रकारचा हल्ला होणं हे खूपच धक्कादायक आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे प्रचारसभेत कुणीतरी येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे असं वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे. तेरणा सहकारी साखर कारखान्याची थकबाकी शिल्लक असल्याने हा हल्ला केल्याचं बोललं जात होतं मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, तेरणा सहकारी साखर कारखान्याची कुठलीही थकबाकी शिल्लक नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी