सरकारची मदत तुटपुंजी, आम्ही सत्तेत आल्यानंतर सातबारा कोरा करणार: उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे,अशी मागणी ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray Aurangabad
सरकारची मदत तुटपुंजी, आम्ही सत्तेत आल्यानंतर सातबारा कोरा करणार: उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  •  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादचा दौरा केला.
  • त्यांनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
  • शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं प्रति हेक्टर 25 हजार रूपये मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं प्रति हेक्टर 25 हजार रूपये मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे. एवढंच काय तर आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वांत आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचं उद्धव यांनी म्हटलंय. 

सरकारकडून 10 हजार कोटींच्या मदतीचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. यावरून उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारची मदत अपूरी पडत असेल तर केंद्र सरकारनं याबाबत पुढाकार घेतला पाहिजे. मोदी सरकारनं शेतकऱ्यांना तातडीचे मदत करायला हवी. राज्य सरकारनं केलेली 10 हजार कोटींची मदत पुरेशे नाही. शेतकऱ्याला तातडीनं हेक्टरी 25 हजार रूपये मदत दिली पाहिजे. यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अटी नसाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. 

पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचंही त्यांनी सांगितलं. पावसाचे दृष्टचक्र आपल्या मागे लागले आहे. शेतकऱ्यांनी खचून जाण्याचं कारण काही नाही, मी प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळून देणार. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही मनात आणू नये, माझा शेतकरी मर्द आहे. तो संकटावर नक्की मात करेल, असा विश्वास शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिली. 

राज्याचा अन्नदाता सध्या संकटात आहे. 10 हजार कोटी पुनर्वसनासाठी पुरेसे नाहीत, आम्ही ते वाढवून देऊ. यासोबतच त्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सज्जड दम देत म्हटलं की, शेतकऱ्यांची मदत करत असताना कागदपत्रांचा घोळ घालू नका. 

उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना वचन 

सत्तेत आल्यास तुमचा सातबारा कोरा करेन, हे माझे शेतकऱ्यांना वचन आहे. मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. मी नेता म्हणून नाही तर एक कुटुंब प्रमुख म्हणून आलो आहे. कारण भलेभले नेते मोठे झाल्यावर विसरून जातात, असंही त्यांनी म्हटलंय. 

एवढंच काय तर उद्धव ठाकरेंनी कर्जवसुलीसाठी नोटीसा बजावणाऱ्या बँकांनाही इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना नोटिसा बजावत असाल तर त्या जाळूनच टाकू पण तुम्हालासुद्धा वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा त्यांनी सज्जड दमच दिला आहे. 

'मी पुन्हा येईन' वर टोला

जाता जाता परतीचा पाऊस मी पुन्हा येईन म्हणतो, त्याची भीती वाटते, असा टोला मुख्यमंत्र्यांना त्यांनी लगावत शिवसेना सत्तेत असेल की नाही हे येणाऱ्या दिवसांत कळेलचं असं सुचक वक्तव्यही त्यांनी केलं. तसंच पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा नसतो, असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी