औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर (poster war) वॉर बघायला मिळालं आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं ठिकठिकाणी शिवसेनेचे पोस्टर लावले गेले असून, मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळत आहे. उद्या म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची भव्य सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता काही तासातच औरंगाबादेमध्ये पोहोचणार असून, त्यांच्या येण्याआधीचं औरंगाबादमध्ये शिवसेनेने जागोजागी पोस्टर बाजी केली असल्याने उद्याची होणारी मनसेची सभा नेमकी कशा पद्धतीने पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर १ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पोलिसांनी काही अटी-शर्तींच्या आधारावर सभेला परवानगी दिली आहे.
अधिक वाचा : आज राजस्थानला चितपट करून मुंबई उघडणार विजयाचं खातं?
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील फेसबुकवर 'हे बाळासाहेबांचं संभाजीनगर' अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे, नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद दिसून येत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे हे हॉटेलमध्ये थांबणार आहेत त्या हॉटेलच्या काही अंतर परिसरात शिवसेनेच्या वतीने होर्डिंग लावण्यात आल्या आहेत. या होर्डिंगवर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरे होणे नाही, असे बॅनर लावण्यात आले आहेत.
अधिक वाचा : के.एल राहुल आणि अथिया शेट्टी होणार रणबीर आलियाचे शेजारी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला राज ठाकरे यांनी ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला असल्याने १ मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात यासाठी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : नीट पीजी २०२२ स्थगित करण्याची मागणी, आरोग्य मंत्र्यांना पत्र