अचानकपणे वाढतेय उस्मानाबादेत बाधितांची संख्या; आता आहेत एवढे रूग्ण!

औरंगाबाद
अजहर शेख
Updated May 22, 2020 | 10:00 IST

परंडा तालुक्यातील खांडेश्वर वाडीतील रुग्णाच्या संपर्कातील २७ वर्षीय तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्णाच्या संपर्कातील चार जण आणि एका १९ वर्षीय युवतीचाही समावेश आहे.

The number of positive patients in Osmanabad is suddenly increasing; There are so many patients now!
अचानकपणे वाढतेय उस्मानाबादेत बाधितांची संख्या; आता आहेत एवढे रूग्ण!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गुरुवारी २१ मे रोजी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याचे आल्याचे समोर आले
  • वाशी तालुक्यातील ६ वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह
  • उमरगा येथील महिलेला कोरोनाची लागण

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात पहिला रूग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेतली होती. त्याच्यासह इतर दोघांवर उपचार करून त्यांना कोरोना मुक्त केले होते. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात मुंबई, पुणे, या ठिकाणावरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.  त्यातील काही जण कोरोनाबधीत आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. गुरुवारी २१ मे रोजी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याचे समोर आले आहे. दुपारी १ उमरगा येथील महिलेसह नवीन ६ रुग्णाचे अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. 

वाशी तालुक्यातील ६ वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह

वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील सहा वर्षांची मुलगी, परंडा तालुक्यातील खांडेश्वर वाडीतील रुग्णाच्या संपर्कातील २७ वर्षीय तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्णाच्या संपर्कातील चार जण आणि एका १९ वर्षीय युवतीचाही समावेश आहे. त्यामुळे रुग्ण संख्या २३ वर गेली आहे. मात्र पूर्वी चार जण बरे होऊन घरी गेले आहेत.

उमरगा येथील महिलेला कोरोनाची लागण

उमरगा येथील एका महिलेला गुरुवारी दुपारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालामध्ये ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १७ वर गेली आहे. ही महिला मुंबईवरून उमरगा शहरातील एसटी कॉलनी येथे परतली होती. त्यानंतर त्रास सुरू झाल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 

महिलेच्या दोन चाचण्या निगेटिव्ह तर तिसरी पॉझिटिव्ह

उमरगा येथे कोरोनाबधित महिला आढळली असून विशेष म्हणजे महिलेचे अगोदरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यात रात्री उशिरा सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा चांगलाच शिरकाव व्हायला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत आता कोरोनाने खातं उघडल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीच्या पानिपत मार्गे आला होता पाहिला रूग्ण

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव हा दिल्लीच्या पानिपतमार्गे उस्मानाबाद येथे आला होता. तर दुसरा कोरोना पॉझिटिव्ह मुंबईच्या एका प्रसिद्ध हॉटेलमधील कर्मचारी होता. त्याची कोरोनाची चाचणी मुंबई येथेच करण्यात आली होती. मात्र तो दुधाच्या टँकरने उस्मानाबादेत आला होता. तर तिसरा कोरोना पॉझिटिव्ह हा जिल्ह्यातीलच होता. असे एकंदरीत तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्ण असल्याकारणाने जिल्हा ऑरेंज झोनमध्ये होता. उपचारानंतर या तिघांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या असल्याने जिल्ह्यातील नागरिक आता आनंदी झाले आहेत.त्या तिन्हीही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
मात्र सध्या जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रूग्ण असल्याकारणाने कोरोनाने जिल्ह्याला विळखा घातला आहे असच म्हणावे लागेल.

जिल्ह्यात भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांपासूनच जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून, सध्या जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी एका दिवसात सात पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. सर्व कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण हायरिस्क भागातून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपर्कातील रुग्णदेखील वाढत असल्याने जिल्ह्यावरील धोका वाढत असल्याचे चित्र आहे. पंधरा ते वीस दिवसांमध्ये फक्त ग्रामीण भागात जवळपास २० हजार लोकांची, बाहेरून जिल्ह्यात आल्याची नोंद आहे.


त्यांना क्वारंटाइन केले असले तरी धोका केव्हाही उद्भवण्याची शक्यता आहे. सध्यातरी जिल्ह्यातील उस्मानाबाद आणि तुळजापूर नगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित सहा जणाच्या संपर्कात आलेल्या ७४ लोकांचे स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. गुरुवारी रात्री सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम प्रशासन करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी