सोसायटीने उभारले गणेशोत्सवाच्या निधीतून २० खाटांचे कोव्हिड सेंटर

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 15, 2020 | 18:41 IST

Covid Center: औरंगाबाद येथील ब्लू बेल सोसायटीने गणेशोत्सवासाठी गोळा केलेल्या निधीतून २० खाटांचे कोव्हिड सेंटर उभं केलं आहे. ब्लू बेल सोसायटीची नेमकी संकल्पना काय जाणून घ्या.

covid center
कोव्हिड सेंटर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • गणेशोत्सवासाठी संकलित केलेल्या निधीतून उपक्रम
  • सोसायटीतील दोन सदस्य कोरोनाबाधित
  • ब्लू बेल सोसायटीत राहतात २०० कुटुंब

औरंगाबाद : देशासह महाराष्ट्रात कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरायला सुरुवात केली असून, मराठवाड्यात देखील कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण राज्य शासनाच्या आरोग्य विभागावर पडत आहे. मात्र, सरकारी यंत्रणेतील ताण कमी करण्यासाठी औरंगाबादेतील ब्लू सोसायटीने एक महत्त्वाचा उपक्रम राबवला आहे.

काय आहे ब्लू सोसायटीने राबवलेला उपक्रम

कारोनाविरुद्ध लढा देण्यासाठी औरंगाबाद येथील ब्ल्यू सोसायटी सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून न राहता सिडको एन-१ परिसरातील ब्ल्यू बेल सोसायटीने  इमारत परिसरातच कोव्हिड सेंटर अर्थात विलगीकरण कक्ष तयार केले आहे. दरम्यान हे कोव्हिड सेंटर २० खाटांचे आहे. ब्लू बेल सोसायटी येथील एखादा सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास त्याच्यावर याच सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे इतर कोव्हिड सेंटरवरील ताण आणि संख्या कमी झाल्याने उपचार देखील व्यवस्थित होतील.त्यामुळे ब्ल्यू बेल सोसायटीने राबविलेला हा उपक्रम इतर सोसायटीने राबवला तर याचा नक्कीच फायदा होणार आहे.

सोसायटीतील दोन सदस्य कोरोनाबाधित

सोसायटीतील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने  सोसायटीतील सदस्य एकत्रित येत नगरसेवक राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान याची संपूर्ण माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आली. 

सोसायटीत राहतात २०० कुटुंब 

ब्ल्यू बेल सोसायटी मोठी असून यामध्ये  जवळपास एकूण २०० कुटुंब राहत असल्याची माहिती आहेत. दरम्यान या २०० कुटुंबात एकूण ८०० सदस्य आहेत. ज्यामध्ये  चार ते पाच कुटुंबात डॉक्टर देखील राहतात. त्यामुळे याना कोव्हिड सेंटर सुरू करण्यात त्यांचाही मोठा फायदा झाला आहे. 

गणेशोत्सवासाठी संकलित केलेल्या निधीतून उपक्रम

यावर्षीच्या गणेश उत्सवासाठी गोळा केलेला निधी या कोविड सेंटर साठी वापरण्यात आला आहे. गणेश उत्सवासाठी काही आठवडे बाकी  आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी येणारा गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होणार नसल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे याचा निधी या वैद्यकीय कामात वापरल्यामुळे सोसायटीतील सदस्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विलगीकरण कक्षात या सुविधा असणार

ब्लू बेल सोसायटीने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात पीपीई कीट, सॅनिटाईज्ड बेडस्, ऑक्सिजन, मास्क, उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र खोली, बेड व बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच स्वतंत्र स्वयंपाकघर देखील तयार करण्यात आले आहे. यामध्ये फ्रीज, मायक्रोओव्हन, सिलिंडर, टिव्ही या सुविधा देण्यात आल्या आहेत.

उपक्रम इतर सोसायट्यांनी राबवावा

ब्लू बेल सोसायटीने राबवलेला उपक्रम इतर सोसायट्यांनी राबवला तर आरोग्य यंत्रणा आणि सरकार वरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर रुग्णालयातील किंवा कोविड सेंटरमधील गर्दी कमी झाल्यास इतर लोकांना उपचार देखील चांगला मिळू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी