आई तुळजाभवानीच्या सीमोल्लंघना विषयी 'या' गोष्टी आपल्याला माहिती आहेत का? तर घ्या जाणून

tuljabhavani navaratri festival 2021 : तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करतात. देवीच्या विविध सेवांचा मान हा काही मानकऱ्यांना आहे. त्यापैकीच पालखी आणण्याचा मान हा नगरजवळील भिंगारच्या भगत या  घराण्याकडे आहे

tuljabhavani navaratri festival 2021
सीमोल्लंघना विषयी 'या' गोष्टी आपल्याला माहिती आहेत का?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुळजाभवानी देवीची माहिती ही हिंदू पुराणात सविस्तर सांगितली आहे
  • दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सीमोल्लंघना करिता देवीची  मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते
  • भिंगारच्या जनकोजीची अकरावी पिढी देखील ही सेवा अविरतपणे बजावतेय.

उस्मानाबाद - देशातील शक्तीदेवतांच्या पीठापैकी साडे तीन पीठे ही आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यात आई तुळजाभवानी देवीचे श्रीक्षेत्र तुळजापूरला (Tuljapur) विशेष महत्त्व असून हे एक पूर्ण व आद्यपीठ मानलं जात.तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. तुळजाभवानी देवीची माहिती ही हिंदू पुराणात सविस्तर सांगितली आहे. या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य हे तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे. व भक्तांच्या संकटावेळी सातत्याने आई तुळजाभवानी धावून जाते असे भक्तगण सांगतात. देवीच्या मंदीरात वर्षभरात अनेक विधी, कार्यक्रम पार पडतात त्यापैकीच नवरात्रीस विशेष महत्व आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सीमोल्लंघना करिता देवीची  मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते.

अशी सुरु झाली सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा

तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करतात. देवीच्या विविध सेवांचा मान हा काही मानकऱ्यांना आहे. त्यापैकीच पालखी आणण्याचा मान हा नगरजवळील (nagar) भिंगारच्या भगत या  घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातचं त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा सुरू केली आणि ती प्रथा आजही कायम आहे.

राहुरीकरांना मिळतोय पालखी तयार करायचा मान!

भिंगारच्या जनकोजीची अकरावी पिढी देखील ही सेवा अविरतपणे बजावतेय. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, सोबतच देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती. तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला मात्र ही पालखी राहुरीकर (Rahuri) तयार करतात. या पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. 

देवीचा पलंग कोण देत? आणि तयार कुठे केला जातो?

वर्षातून तीन वेळा तुळजाभवानी मातेची मूर्ती निद्राकाळाकरिता पलंगावर निद्रिस्त जाते. या निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग नगरमधील पलंगे नावाच्या तेली समाजाच्या घराण्याकडून दिला जातो. तर हा पलंग तयार करण्याचं काम हे आंबेगाव-घोडेगावमधील ठाकूर करतात. दसऱ्यापूर्वी एक महिना अगोदर हा पलंग नगर, सोलापूर या जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येतो. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवले जाते. तुळजाभवानीच्या मंदीरात मात्र हा पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे या देवीचं वेगळेपण आहे.

तांबोळी नामक मुस्लिम कुटुंबीय करतात घटस्थापना

देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. अल्पशा मोबदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी