उस्मानाबाद: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची (corona patient) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कोरोनाची संख्या वाढत चालल्यामुळे काही गोष्टींवर पुन्हा एकादा निर्बंध येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी (tuljabhavani temple tuljapur) पासची संख्या देखील निम्याने कमी करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. गेल्या काही दिवसांत तुळजापुरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात राज्यभरातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पासची संख्यादेखील कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंदिरात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व १० वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यापूर्वी तुळजाभवानी दर्शनासाठी २० हजार दर्शन पास दिले जात होते. मात्र आता उद्यापासून दररोज रोज फक्त १० हजार मोफत पास दिले जाणार तर २ हजार पेड पास दिले जाणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाबाबत उपाययोजनांचे लेखी आदेश काढले आहेत.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे या ३ दिवशी व महत्वाच्या सण, उत्सवाच्या दिवशी ३० हजार मोफत पास दिले जात होते तर हे ३ दिवस वगळता इतर दिवशी २० हजार भाविकांना दर्शन पास दिले जात होते मात्र त्यात आता घट करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाची संख्या गेल्या ३ दिवसांत अडीच पटीने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच तुळजापूर तालुकयात सर्वाधिक रुग्ण सापडत असून तुळजापूर तालुका हाय अलर्टवर आहे. तुळजापूर तालुक्यात तुळजाभवानी मातेचे मंदिर असून इथे नेहमी भक्तांची मोठी गर्दी असते त्यामुळे प्रशासनाने दक्षतेच्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रोज १० च्या आसपास रुग्ण सापडत होते मात्र आज गुरुवारी २५ रुग्ण सापडले आहेत.